Satara: अखेर ‘त्या’ पाण्याच्या टाकीला कुलूप | पुढारी

Satara: अखेर ‘त्या’ पाण्याच्या टाकीला कुलूप

तारळे; पुढारी वृत्तसेवा: तारळे गावास पाणीपुरवठा करणार्‍या गावाच्या पाणीपुरवठा टाकीच्या झाकणास ग्रामपंचायतीकडून कुलूप लावण्यात आले आहे. याबाबत ‘दैनिक पुढारी’ने वृत्त प्रसिद्ध करत ग्रामपंचायतीसह प्रशासनाचे धोकादायक परिस्थितीकडे लक्ष वेधले होते. त्यामुळेच ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त होत आहे.

तारळे गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी तारळे-जंगलवाडी रस्त्यावर जलस्वराज्य योजनेअंतर्गत पाण्याची बंदिस्त टाकी काही वर्षापूर्वी बांधली आहे. गाव विहीर व धनगरवाडी येथील पाणी उचलून या टाकीत सोडण्यात आले असून तेथून जवळपास संपूर्ण गावाला पाणीपुरवठा केला जातो.

जवळपास साडेसात हजार लोकसंख्या असलेल्या गावाला पाणी पुरवठा करणार्‍या टाकीला देखरेख, साफसफाई व अन्य कारणासाठी झाकण बसविण्यात आले आहे. पण गेल्या काही दिवसांपासून त्या झाकणाला कुलूप लावण्यात आले नाही. त्यामुळे काही लहान मुले टाकीत उतरून पाणी काढत होती. त्यामुळे याबाबत ग्रामपंचायतीने खबरदारीचा उपाय म्हणून कुलूप लावले आहे.

तळीरामांवर करणार पोलिस कारवाई …

पाण्याच्या टाकीवर तळीराम ओली पार्टी करतात, अशी स्थानिक लोकांकडून तक्रार येत आहे. त्यामुळे यापुढे असा प्रकार आढळल्यास संबंधित तळीरामांवर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करणार असल्याचा इशारा ग्रामपंचायतीकडून देण्यात आला आहे.

Back to top button