नाशिक : गोदाप्रदुषण रोखण्यासाठी आधी प्रबोधन नंतर दंडात्मक कारवाई | पुढारी

नाशिक : गोदाप्रदुषण रोखण्यासाठी आधी प्रबोधन नंतर दंडात्मक कारवाई

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गोदावरी नदीतील वाढत्या प्रदूषण प्रकरणी मनपा आयुक्त रमेश पवार यांनी गोदावरीत मिसळणार्‍या सांडपाण्याच्या जोडण्या शोधण्याचे आदेश मनपाच्या पर्यावरण विभागाला दिले आहेत. तसेच प्रदूषण करणारे नागरिक आणि आस्थापना यांचे आधी प्रबोधन केले जाईल आणि त्यानंतरही प्रदूषण करताना आढळून आल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे गेल्या 20 वर्षांत प्रदूषण रोखण्यासाठी 500 कोटींहून अधिक निधी खर्च झाला आहे.

सध्या गोदावरीचे सौंदर्यीकरण करण्यासाठी स्मार्ट सिटी योजनेंतर्गत विविध कामांसाठी सुमारे 500 कोटींचा खर्च केला जाणार आहे. त्या अनुषंगाने प्रोजेक्ट गोदा प्रकल्प राबविला जात आहे. याच प्रकल्पाच्या माध्यमातून गोदावरी नदीचे पात्र खोलीकरण करणे आणि रामकुंड व परिसरातील काँक्रिटीकरण काढून नैसर्गिक पाण्याचे स्रोत जिवंत करण्यात येणार आहे.

उच्च न्यायालयात दाखल याचिकेच्या द़ृष्टीने न्यायालयाने गोदावरी प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना दिले आहेत. नूतन मनपा आयुक्त रमेश पवार यांनी गोदावरी प्रदूषणमुक्त करण्याच्या द़ृष्टीने शहरातून जाणारे गोदावरीचे जवळपास 19 किमी क्षेत्रात प्रदूषण करणार्‍या स्रोतांचा शोध घेण्याचे काम हाती घेतले आहे. गोदावरीसह नंदिनी (नासर्डी) नदीत काळे पाणीमिश्रित होत असल्याने त्याचा शोध घेण्यात येत असून, त्यात अनेक ठिकाणी पावसाळी गटारीला सांडपाण्याचे कनेक्शन जोडण्यात आल्याची बाब समोर आली आहे. याबाबत जनप्रबोधन करण्यात येणार आहे. प्रामुख्याने गंगापूर गाव ते दसक-पंचक या मनपा हद्दीतील गोदावरी पात्रात 67 नाले येऊन मिळतात आणि त्याद्वारेच गोदावरी प्रदूषित होत असल्याचे समोर आले असून, काही नाल्यांद्वारे नासर्डी, नंदिनी, कपिला या उपनद्यांमध्ये सांडपाणी मिसळते. हेच पाणी पुढे उपनद्यांमधून गोदावरीत येत असल्याने आता नाल्यांमधून येणारे सांडपाणी हे एसटीपींना जोडले जाणार आहे. त्यानुसार उपाययोजना करण्यास सांगितले आहे.

हेही वाचा :

Back to top button