अखिलेश यादव यांना लवकरच मोठा झटका, शिवपाल यादव भाजपवासी होणार? | पुढारी

अखिलेश यादव यांना लवकरच मोठा झटका, शिवपाल यादव भाजपवासी होणार?

लखनौ ; हरिओम द्विवेदी : समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांना लवकरच मोठा झटका बसू शकतो. त्यांचे काका आणि पक्षाचे आमदार शिवपाल यादव हे भाजपमध्ये सामील होऊ शकतात. त्या बदल्यात भाजप त्यांना राज्यसभेवर पाठविण्याची शक्यता आहे.

दोन दिवस दिल्लीत भाजपच्या सर्वोच्च नेतृत्वासोबत चर्चा आणि त्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतल्याने शिवपाल यादव राज्यसभेवर जाणार असल्याच्या अटकळी वेगवान झाल्या आहेत. त्यामुळे सून अपर्णा यादव यांच्यानंतर आता भाऊ शिवपाल देखील भाजपमध्ये गेल्यास मुलायमसिंह यांनाही हा मोठा धक्का असणार आहे.

उत्तर प्रदेशात जुलैमध्ये राज्यसभेच्या 11 जागा रिक्त होत आहेत. यातील 7-8 जागांवर भाजपचा विजय निश्चित आहे. आमदारकीचा राजीनामा देऊन यापैकी एका जागेवर शिवपाल यादव यांना पाठविले जाऊ शकते. त्यानंतर जसवंतनगर विधानसभा मतदारसंघातून शिवपाल यांचा मुलगा आदित्य यादव यांना भाजपकडून मैदानात उतरविण्याचे नियोजन असल्याचे समजते. याद्वारे सपचा बालेकिल्ला असलेल्या जसवंतनगरमध्ये कमळ फुलविण्याचे भाजपचे प्रयत्न आहेत. भाजपने आतापासूनच 2024 च्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्याचाच भाग म्हणून या रणनीतीकडे पाहिले जात आहे.

शिवपाल अखिलेशवर नाराज

2017 मध्ये अखिलेश आणि शिवपाल यांच्यात वर्चस्वावरून संघर्ष झाला हता. पाच वर्षांनंतर 2022 मध्ये दोघे एकत्र आले. अखिलेशने शिवपाल यांच्या पक्षाला केवळ एक जागा दिली. त्यामुळे शिवपाल अस्वस्थ होते. 26 मार्च रोजी अखिलेश यांनी पक्षाच्या आमदारांच्या बैठकीत शिवपाल यांना बोलावले नव्हते. त्यामुळे ते नाराज झाले होते. त्यातून 28 मार्चच्या आमदारांच्या बैठकीत ते अनुपस्थित राहिले.

सहयोगी पक्षांची ‘वेगळी’ भूमिका

दरम्यान, शिवपाल यादवच नाही तर समाजवादी पक्षाच्या इतर सहयोगी पक्षांनीही वेगळे होण्याचा सूर आळवण्यास सुरुवात केली आहे. अपना दल (कमेरावादी) पक्ष दुसरीकडे समीकरणे आजमावण्याची शक्यता आहे. महान दलाचे केशवदेव मौर्य हेसुद्धा आघाडीतून बाहेर पडू शकतात.

Back to top button