

कोल्हापूर; सुनील सकटे : उपलब्ध विजेच्या तुलनेत मागणी वाढल्याने ऐन उकाड्यात जनतेला भारनियमनाचा झटका बसला आहे. ग्रामीण भागात रोज दोन तास वीजपुरवठा खंडित होत आहे. उकाड्याने हैराण झालेल्या जनतेतून भारनियमनामुळे तीव— संताप व्यक्त होत आहे.
उन्हाच्या झळा वाढत असतानाच वीज गायब होत असल्याने लोकांचे विशेषतः महिला व रुग्णांचे हाल होत आहेत. उन्हाळ्यामुळे विजेची मागणी वाढली आहे. दररोज सुमारे 24 हजार 365 मेगावॅटची मागणी असून, पाच ते सात हजार मेगावॅट विजेचा तुटवडा आहे. कोळसाटंचाई आणि वीज कर्मचार्यांचा दोनदिवसीय संप, यामुळे वीजनिर्मितीत घट झाली आहे. वीजनिर्मिती पूर्ववत होण्यासाठी काही काळ जावा लागेल, तोवर भारनियमन हाच पर्याय असल्याचे सांगण्यात आले.
वीज बिल वसुली, वीज गळती आणि वीज चोरी या निकषांवर भारनियमनासाठी गट तयार केले आहेत. ए, बी, सी, डी, ई, एफ, जी आणि जी 1, जी 2, जी 3 अशी विभागणी केली आहे. उत्तम वसुली आणि कमी गळती असणारी गावे शहरे अनुक्रमे ए गटापासून सुरू होतात. तर थकबाकी जास्त आणि वीज गळती व चोरी जास्त अशी गावे शेवटच्या गटात येतात. भारनियमन शेवटच्या गटापासून सुरू केले जाते.
जिल्ह्यात ई, एफ, जी, जी 1, जी 2 आणि जी 3 या गटांत भारनियमन सुरू आहे. यामध्ये गडहिंग्लज, जयसिंगपूर आणि ग्रामीण विभाग एकचा समावेश आहे. या विभागात 60 ते 70 छोटी गावे, वाड्यावस्त्यांमध्ये त्याची अंमलबजावणी सुरू आहे. तिथे सकाळी पावणेअकरा ते दुपारी 12 आणि दुपारी पावणेतीन ते सव्वाचार या वेळेत वीजपुरवठा खंडित केला जात आहे, तर ई आणि एफ या गटातील गावांत सकाळी पावणेअकरा ते दुपारी 12 आणि दुपारी तीन ते चार या वेळेत वीजपुरवठा खंडित केला जात आहे. चंदगड, साळवण, कुरूंदवाड, कळे, तुडये या परिसरासह करवीर तालुुक्यातील काही वाड्यावस्त्यांनाही त्याचा झटका बसला आहे. राज्यात दररोज 24 हजार, तर जिल्ह्यात दररोज 900 ते एक हजार मेगावॅटची मागणी आहे.