नाशिक : अवघ्या 15 दिवसांच्या नवजात बालकांची यशस्वी हृदयशस्त्रक्रिया | पुढारी

नाशिक : अवघ्या 15 दिवसांच्या नवजात बालकांची यशस्वी हृदयशस्त्रक्रिया

नाशिक (कळवण) : पुढारी वृतसेवा
राष्ट्रीय आरोग्य अभियानाचा भाग असलेल्या राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत अंगणवाडी धनोली, ता. कळवण येथील अवघ्या 4 महिन्यांची बालिका वेदिका नारायण साबळे तसेच कळवण येथील कोठावदे दाम्पत्याच्या 15 दिवसांच्या नवजात बालकाची मोफत व यशस्वी हृदयशस्त्रक्रिया करण्यात आली.

मुंबई येथील कोकिळाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. मोहंती व समूहाने ही शस्त्रक्रिया केली असून, बालकांच्या आरोग्यासाठी राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रम नवसंजीवनी ठरत असल्याचे यावरून सिद्ध होत आहे.

राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत अंगणवाडीतील वय वर्ष 0 ते 6 वयोगटातील बालकांची वर्षातून 2 वेळा व शाळेतील 6 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांची वर्षातून एकदा सखोल आरोग्य तपासणी केली जाते. आरोग्य तपासणीदरम्यान बालकांचे वजन, उंची, शारीरिक व मानसिक वाढ या बाबींची तपासणी करून किरकोळ आजारी बालकांना औषधोपचार केले जातात. तसेच, गंभीर आजारी बालकांच्या उपचारांसाठी तत्काळ उपचार आवश्यक असलेल्या बालकांना राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रम, महात्मा फुले जीवनदायी योजना, मुख्यमंत्री सहायता निधीतून व सामाजिक संस्थेद्वारे वैद्यकीय मदत मिळवून दिली जात आहे.

कळवण उपजिल्हा रुग्णालयांतर्गत वैद्यकीय अधीक्षक डॉ. अनंत पवार कार्यरत असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण चार पथकांसह डॉ. मनोज सूर्यवंशी, डॉ. दीप्ती खांडवी, औषधनिर्माण अधिकारी वैभव काकुळते यांनी या कामी परिश्रम घेतले. तसेच नाशिकचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. शरद पाटील, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अनंत पवार, आरबीएसकेचे जिल्हा समन्वयक अधिकारी दीपक चौधरी, संदीप पाटील व डीईआयसी विभागाच्या समन्वयक डॉ. दीपा माळोदे यांचेदेखील सहकार्य लाभले आहे

संकटसमयी मैत्रीने दिला हात…
कळवण येथील उमेश कोठावदे यांनी 15 दिवसांच्या व जन्मतः अवघे 1600 ग्रॅम वजन असलेल्या बालकाची प्रकृती खालावत असल्याचे मित्र व कळवण उपजिल्हा रुग्णालयातील आरबीएसकेचे औषधनिर्माण अधिकारी वैभव काकुळते यांना सांगितले होते. त्यांनी सहकारी वैद्यकीय अधिकार्‍यांसोबत बालकाच्या वैद्यकीय बाबींशी शहानिशा करून तत्काळ गुंतागुंतीची व अवघड हृदयशस्त्रक्रिया करणे अत्यावश्यक असल्याची माहिती जिल्हा समन्वयक दीपक चौधरी यांना दिली. त्यांनी त्यावर तत्काळ कोकिळाबेन अंबानी रुग्णालयात राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रम योजनेअंतर्गत दाखल केले. अत्यंत अवघड हृदयशस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्यानंतर बालकाला सुखरूप घरी सोडण्यात आले आहे.

हेही वाचा :

पहा व्हिडिओ : पाणस्थळी हमखास दिसणाऱ्या भोरड्यांच्या या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

 

Back to top button