नाशिक : ‘गोदावरीतील पाणवेलींचे प्रमाण वाढल्याने विभागीय आयुक्तांनी दिले ‘हे’ आदेश | पुढारी

नाशिक : ‘गोदावरीतील पाणवेलींचे प्रमाण वाढल्याने विभागीय आयुक्तांनी दिले 'हे' आदेश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गोदावरी नदीमध्ये आनंदवली ते नांदूरमध्यमेश्वरपर्यंत पाणवेलीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. आता तर रामकुंड परिसरातही पाणवेली वाढल्या असून, पर्यावरणप्रेमींनी तक्रारी केल्यानंतर विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमेंनी यंत्रणांची व्हीसीद्वारे तातडीने बैठक घेत पाणवेली काढण्याचे आदेश दिले आहेत. तसेच ठाणे आणि औरंगाबादच्या धर्तीवर ’ग्लायफोसल’ या रासायनिक द्रव्याचा वापर करून उपाययोजना करण्याची सूचना केली आहे.

गमे यांच्या आदेशानंतर महापालिका आयुक्त रमेश पवार यांनी पर्यावरण विभागाला या संदर्भातील अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. गोदावरी नदी प्रदूषणासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल आहे. राष्ट्रीय हरित लवादाने तर गोदावरीचे पाणी स्नान करण्यासही योग्य नसल्याचे ताशेरे ओढले आहे. त्यामुळे गोदावरीच्या प्रदूषणाचा प्रश्न बिकट बनला आहे. उच्च न्यायालय आणि हरित लवादाने कानउघडणी केल्यानंतरही संबंधित यंत्रणांकडून ठोस पावले उचलली जात नसल्याने आता तर संपूर्ण गोदावरी नदीच पाणवेलींच्या विळख्यात सापडली आहे. पाणवेली थेट रामकुंडापर्यंत येऊन पसरल्याने याचिकाकर्ते राजेश पंडित यांनी विभागीय आयुक्त गमे यांच्याकडेच थेट तक्रार केली.

तक्रारीनुसार गमे यांनी सोमवारी (दि.28) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जिल्हाधिकारी गंगाधरन डी., महापालिका आयुक्त रमेश पवार आणि जिल्हा परिषद सीईओ लीना बनसोड यांची बैठक घेतली. बैठकीत गमे यांनी पाणवेली तातडीने काढण्याचे निर्देश दिले. येत्या 15 दिवसांत पुन्हा बैठक घेण्यात येणार असून, त्यापूर्वी यंत्रणांकडून काय उपाययोजना केल्या जातात त्याकडे लक्ष लागून आहे.

हेही वाचा :

Back to top button