नाशिक : त्या मानवी अवयवांसंदर्भात आणखी महत्वाचा खुलासा | पुढारी

नाशिक : त्या मानवी अवयवांसंदर्भात आणखी महत्वाचा खुलासा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मुंबई नाका परिसरातील एका गाळ्यात कंटेनरमध्ये मानवी अवयव आढळून आल्यानंतर खळबळ उडाली होती. त्यामुळे पोलिसांनी याचा तपास जिल्हा शल्यचिकित्सकांना करण्यास सांगितला होता. त्यानुसार आरोग्य विभागाने महाराष्ट्र शरीररचनाशास्त्र कायद्यानुसार वैद्यकीय शिक्षण किंवा संशोधनासाठी मानवी अवयव बाळगण्याची मुभा फक्त वैद्यकीय महाविद्यालयांनाच असल्याचे स्पष्ट केले आहे. जिल्हा रुग्णालयाने त्या अवयवांची तपासणी करून अहवाल तयार केला आहे. लवकरच तो पोलिसांकडे सुपूर्द केला जाणार आहे.

मुंबई नाका येथील पोलिस ठाण्याच्या मागे असलेल्या हरी विहार सोसायटीच्या बंद गाळ्यामध्ये रविवारी (दि.27) मानवी अवयव सापडल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणी शहर पोलिसांनी शरीररचनाशास्त्र कायद्यानुसार जिल्हा शल्यचिकित्सकांना चौकशी करण्यास सांगितले असून, अवशेषांची चौकशी करण्यात आली. तपासात हा गाळा शुभांगिनी शिंदे यांच्या मालकीचा असल्याचे आढळून आले. शिंदे यांचा मुलगा डॉ. किरण शिंदे हे कान, नाक, घसा तज्ज्ञ असून, त्यांनी अभ्यासासाठी 2001 ते 2005 दरम्यान हे अवयव ठेवल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले. कंटेनरमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी आवश्यक असणार्‍या पद्धतीने दोन शीर व मानवी 14 कानांचे तुकडे आढळून आढळले असून, डॉ. किरण शिंदे यांनी हे अवयव आणल्याचे समजते. दोन्ही शीर महिलांचे असून, 14 पैकी दोन कानांचे तुकडे महिलांचे तर उर्वरित कानांचे पुरुषांचे आहेत. जिल्हा रुग्णालयातील फॉरेन्सिक पथकाने डीएनए नमुने जतन केले असून, त्यावरून पुढील तपास होऊ शकतो.

खाजगी ठिकाणी मानवी अवयव बाळगता येता का?

जिल्हा रुग्णालयातील सूत्रांनी सांगितल्यानुसार मानवी अवयव फक्त वैद्यकीय शिक्षण व संशोधनासाठी वैद्यकीय महाविद्यालयात ठेवता येतात. इतर खासगी ठिकाणी मानवी शरीररचनाशास्त्र कायद्यानुसार मानवी अवयव बाळगता येत नाही. त्यामुळे संबंधितांवर पोलिस कोणती कारवाई करतात याकडे लक्ष लागले आहे.

हेही वाचा :

Back to top button