Satara: गोजेगाव येथे साठ एकर ऊस जळून खाक | पुढारी

Satara: गोजेगाव येथे साठ एकर ऊस जळून खाक

सातारा; पुढारी वृत्तसेवा: सातारा तालुक्यातील गोजेगाव येथील धारकारा, मोडा, देशमुख शिवारातील सुमारे साठ एकर ऊस जळून खाक झाला. यामध्ये सुमारे शंभरहून अधिक शेतकर्‍यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान अज्ञात व्यक्तीने आग लावल्याचा शेतकर्‍यांनी आरोप करुन नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

गोजेगाव परिसरात उसाची लागण मोठ्या प्रमाणावर आहे. मंगळवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास गोजेगाव येथील कृष्णा नदीच्या पूर्वेकडून अचानक आगीचा लोट आला वार्‍यामुळे ही आग मोडा, देशमुख व धारकारा या नावाने ओळखल्या जाणार्‍या शिवारातील ऊसाला लागली.

वार्‍यामुळे आगीच्या झळा एवढ्या मोठ्या प्रमाणावर होत्या की, क्षणार्धात सुमारे पन्नास ते साठ एकर ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. तर देशमुख शिवारातील हरभरा-गव्हाच्या पिकालाही आगीची झळ बसली. यामध्ये या परिसरातील सुमारे शंभरहून अधिक शेतकर्‍यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

आगीची बातमी वार्‍यासारखी गावात पसरली असता ग्रामस्थांनी धारकारा शिवाराकडे धाव घेतली. काही ग्रामस्थ व युवकांनी झाडांच्या फांद्या तोडून त्याद्वारे आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. सध्या वीज वितरण कंपनीच्या कामगारांचा संप असल्याने विद्युत पुरवठा बंद आहे. त्यामुळे विहिरीतील पाणी उपसा करता येत नाही आणि पाण्याचे टँकरही भरता येत नसल्याने आग आटोक्यात आणण्यासाठी पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली होती. सायंकाळी अजिंक्यतारा साखर कारखान्याच्या कर्मचार्‍यांनी घटनास्थळी जाऊन जळीत ऊस नुकसानग्रस्त भागाचा पंचनामा केला.

Back to top button