सातारा: महाराष्ट्रात भाजपचा नामोनिशान राहणार नाही | पुढारी

सातारा: महाराष्ट्रात भाजपचा नामोनिशान राहणार नाही

सातारा; पुढारी वृत्तसेवा: देशात भाजपने सत्तेचा गैरवापर करून सत्ता मिळवली आहे. ही सत्ता पुढे कायम राहिली तर भविष्यात लोकशाही शिल्लक राहणार नाही. यासाठीच महाराष्ट्रात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आघाडी सरकार स्थापन करण्यात आले. या सरकारमधील तिन्ही पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढले तर महाराष्ट्रात भाजपचा नामोनिशान राहणार नाही, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.

मसूर (ता. कराड) येथे काँग्रेसच्या डिजिटल बुथ सदस्य नोंदणी, आढावा बैठक व मार्गदर्शन मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कोयना दूध संघाचे चेअरमन वसंतराव जगदाळे होते. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अ‍ॅड. उदयसिंह पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव माजी सभापती बाळासाहेब शिरसाठ, जिल्हा परिषद सदस्य निवासराव थोरात, माजी सदस्य नंदकुमार जगदाळे, मारुती जाधव, सुदाम दीक्षित, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, जिल्हा युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष अमित जाधव, काँग्रेसचे कराड उत्तरचे अध्यक्ष अविनाश नलावडे, युवा नेते इंद्रजीत चव्हाण, शैलेश चव्हाण आदींची प्रमुख उपस्थिती होती.

आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, यापुढे डिजिटल युगात काँग्रेस पक्षाच्या पदाधिकार्‍यांच्या सर्व निवडणुका या आधुनिक पद्धतीने होणार आहेत. त्यासाठी डिजिटल बुथ सदस्य नोंदणी महत्त्वाची आहे. यासाठी कमी वेळ असून काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी सहकार्य करून जास्तीत जास्त बुथ सदस्य नोंदणी करावी.

अ‍ॅड. उदयसिंह पाटील म्हणाले, काँग्रेस पक्षाची जडण-घडण स्वातंत्र्यपूर्व काळापासून आहे. त्यावेळी लोकांनी जो संघर्ष केला सुदैवाने आताच्या लोकांना तो करावा लागत नाही. माजी सहकार मंत्री स्वर्गीय विलासराव पाटील-उंडाळकर यांनी काँग्रेससाठी जिल्ह्यात मोठे योगदान दिले होते. प्रास्ताविक माजी जिल्हा परिषद सदस्य सुदाम दीक्षित यांनी केले. सूत्रसंचालन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादलचे सरचिटणीस उमेशराव साळुंखे यांनी केले. आभार अ‍ॅड. उदयसिंह जगदाळे यांनी मानले.

जिल्हाध्यक्ष बरळताहेत, लक्ष देऊ नका….

माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्यामुळेच जिल्ह्यातील एका नेत्याला राज्यात वेगळी ओळख निर्माण झाली होती. मात्र एका पक्षाचा जिल्हाध्यक्ष होताच त्यांनी काहीही बरळायला सुरुवात केली आहे. इतर कोणत्याही पक्षावर टीका न करता आर्धी काँग्रेसच फुटेल असे ते बरळत आहेत. त्यांच्याकडे कोणीही लक्ष देऊ नका. जिल्ह्यात काँग्रेस एकसंघ असून यापुढेही एकसंध राहील असा विश्वास व्यक्त करत जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष आ. जयकुमार गोरे यांच्यावर टीका केली.

Back to top button