नाशिक : ‘त्या’ मानवी अवयवांची कसून चौकशी | पुढारी

नाशिक : ‘त्या’ मानवी अवयवांची कसून चौकशी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : मुंबई नाका पोलिस ठाण्यामागील हरिविहार सोसायटीच्या बंद गाळ्यामध्ये रविवारी रात्री मानवी अवयव सापडल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणी शहर पोलिसांनी महाराष्ट्र शरीरशास्त्र कायद्यानुसार जिल्हा शल्य चिकित्सकांना चौकशी करण्यास सांगितले असून, त्यांच्यामार्फत या अवयवांची चौकशी होणार आहे.

मुंबई नाका परिसरातील हरिविहार सोसायटीच्या तळमजल्यावरील गाळ्यातून दुर्गंधी येत असल्याने हा प्रकार उघडकीस आला. नागरिक व पोलिसांनी पाहणी केली असता, गाळ्यात कंटेनरमध्ये रासायनिक प्रक्रिया करून मानवी कान ठेवलेले आढळून आले. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली. पोलिसांच्या तपासात हा गाळा शुभांगिनी शिंदे यांच्या मालकीचा असल्याचे आढळून आले. शिंदे यांचे चिरंजीव डॉ. किरण शिंदे हे कान, नाक, घसातज्ज्ञ असून, त्यांनी अभ्यासासाठी हे कान ठेवल्याची शक्यता वर्तविण्यात आली. या कंटेनरवर 2005 हे साल लिहिलेले असल्याने तेव्हापासून हे अवयव या गाळ्यात असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला. या कंटेनरमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी आवश्यक असणार्‍या पद्धतीने मानवी आठ कान आढळून आल्याने डॉ. किरण शिंदे यांनी अभ्यासासाठी हे कान आणल्याचे समोर येत आहे. याबाबत पोलिस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी सांगितले की, महाराष्ट्र शरीरशास्त्र कायद्यानुसार, अभ्यासाच्या हेतूने मानवी अवशेष उपलब्ध करून देण्याचे अधिकार जिल्हा शल्य चिकित्सकांना असतात. त्यामुळे या घटनेचा तपास जिल्हा शल्य चिकित्सक करतील. त्यांचा अहवाल आल्यानंतर पुढील प्रक्रिया होईल.

पोलिसांकडून पत्र मिळाले आहे. या घटनेचा तपास शरीरशास्त्र कायद्यानुसार केला जाईल. जिल्हा रुग्णालयातील फॉरेन्सिक टीमकडून अवयवांची पाहणी करून पुढील 48 तासांत प्राथमिक अहवाल पोलिसांना सादर करण्यात येईल. तसेच काही अवयवांचे नमुने संकलित करून न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेत पाठविले जातील. मानवी अवयव अभ्यासासाठी ठेवता येतात. मात्र, ते नोंदणीकृत महाविद्यालये किंवा रुग्णालयातच ठेवता येतात. अवयव जतन करण्यासाठी ते फॉर्मोलिनमध्ये ठेवले जातात.
– डॉ. अशोक थोरात, जिल्हा शल्य चिकित्सक, नाशिक

हेही वाचा :

Back to top button