डायरीतील ‘मातोश्री’ कोण माहीत नाही; पण चौकशीतून कोणीही सुटणार नाही : चंद्रकांत पाटील | पुढारी

डायरीतील ‘मातोश्री’ कोण माहीत नाही; पण चौकशीतून कोणीही सुटणार नाही : चंद्रकांत पाटील

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

मुंबई महापालिका स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव यांच्याकडे आयकर खात्याला कसली डायरी सापडली आहे, त्यात नेमक्या कोणत्या ‘मातोश्री’ची नोंद आहे, हे मला माहिती नाही; पण मला एवढेच दिसतेय की, चौकशीतून कोणीही सुटू शकत नाही आणि खूप काही होणार आहे, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना दिला.

‘मातोश्री’चा उल्लेख असलेल्या डायरीची ईडीकडून चौकशी व्हायला हवी या आ. अतुल भातखळकर यांच्या मागणीचे पाटील यांनी समर्थन केले. दरम्यान, सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेने उभारलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्मारकाच्या उद्घाटनाला केवळ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना निमंत्रित करणे योग्य नाही. या महापालिकेत भाजपची सत्ता आहे. उद्घाटन समारंभास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाही निमंत्रित करायला हवे, असे मत त्यांनी व्यक्त केले. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी केवळ पवारांच्या हस्ते उद्घाटन करण्यास केलेला विरोध योग्यच असल्याचे त्यांनी सांगितले.

पाटील म्हणाले, सांगलीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्मारकाचे केवळ शरद पवार यांच्याच हस्ते उद्घाटन व्हावे, यासाठी त्यांच्या कार्यक्रमाच्या आधीपर्यंत त्या ठिकाणी निर्बंध लावले आहेत. हा पोलिस यंत्रणेचा दुरुपयोग आहे. कोल्हापूर उत्तरमधील प्रचारासाठी भाजपचे तीन लाख कार्यकर्ते येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

खा. संजय राऊत यांनी केलेल्या टीकेकडे लक्ष वेधले असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. आपण ‘सामना’ वृत्तपत्र वाचणे आणि संजय राऊत यांच्याबद्दल बोलणे बंद केले आहे. काळच तुम्हाला दाखवेल, तुम्ही कोणाची खिल्ली उडवता, असा टोलाही त्यांनी खा. राऊत यांना लगावला.

Back to top button