मोठा हातोडा घेऊन दापोलीकडे जाणाऱ्या किरीट सोमय्यांना खेड पोलिसांनी रोखले | पुढारी

मोठा हातोडा घेऊन दापोलीकडे जाणाऱ्या किरीट सोमय्यांना खेड पोलिसांनी रोखले

महाड, पुढारी वृत्तसेवा : रायगड हद्द ओलांडून खेड हद्दीत प्रवेश करतानाच खेड पोलिसांकडून भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना १५९ ची नोटीस बजाविण्यात आली आहे. किरीट सोमय्या यांच्या वाहनांनी रायगड हद्द पास केल्यानंतर रत्नागिरी हद्दीत प्रवेश केला. यावेळी त्यांच्या गाड्या अडविण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली असून सोमय्या खेडमध्ये असल्याचे सूत्रांकडून समजते.

दापोली मुरुड समुद्रकिनारी बांधण्यात आलेले साई रिसॉर्ट (Sai Resort)  मंत्री अनिल परब यांच्या मालकीचे आहे, असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अनेकदा केला आहे. आज ( दि. २६) सोमय्या हे दापोली मुरुड येथे मंत्री अनिल परब यांचे साई रिसॉर्ट तोडण्यासाठी जात आहेत. शेकडो कार्यकर्त्यांचा ताफा त्यांच्या सोबत आहे. दरम्यान,  सोमय्या यांना रोखण्यासाठी येथील पर्यटन व्यवसायिकदेखील आक्रमक झाले आहेत.  राष्ट्रवादी पक्षाचे माजी आमदार संजय कदम यांनीही किरीट सोमय्या यांना कडाडून विरोध केला आहे. त्यामुळे दापोलीतील राजकीय वातावरण तापले आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दापोली येथील साई रिसॉर्ट तोडणार, असा दावा केला आहे. हे रिसॉर्ट तोडण्याबाबतचा आदेश निघाले आहेत, असे देखील सोमय्या अनेकदा ट्विटच्‍या माध्‍यमातून स्‍पष्‍ट केले आहे. मात्र आजपर्यंत साई रिसॉर्टची एक वीट हलली नाही. त्यामुळे स्वतः साई रिसॉर्ट तोडण्यासाठी दापोलीत येत आहोत, असे ट्विटदेखील सोमय्या यांनी २४ मार्च रोजी केले होते. २६ रोजी सायंकाळी पाच वाजता सोमय्या हे दापोली पोलीस स्थानक येथे भेट देऊन ५ वाजता ते मुरुड येथे रवाना होणार असल्याचे येथील भाजप कार्यकर्ते सांगत आहेत. त्यामुळे दापोलीत राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

हेही वाचलंत का ?  

Back to top button