औषधांच्या किंमतीत १ एप्रिलपासून १०.७ टक्क्यांची वाढ | पुढारी

औषधांच्या किंमतीत १ एप्रिलपासून १०.७ टक्क्यांची वाढ

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : देशात पेट्रोल-डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढत असून एलपीजी आणि सीएनजीचे दरही वधारले आहेत. आता जीवनावश्यक औषधांची (Medicine) खरेदी करणाऱ्यांनाही महागाईची झळ बसण्याची शक्यता आहे. १ एप्रिलपासून ८०० हून अधिक जीवनावश्यक औषधांच्या किंमतीत १०.७ टक्के वाढ होणार आहे.

ताप, हृदयविकार, उच्च रक्तदाब, त्वचारोग आणि अशक्तपणा इत्यादींवर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पेनकिलर आणि पॅरासिटामॉल, फेनिटोइन सोडियम, मेट्रोनिडाझोल यासारख्या अत्यावश्यक औषधांचा त्यात समावेश आहे. केंद्र सरकारने शेड्यूल औषधांच्या (Medicine) किंमती वाढवण्यास परवानगी दिल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे.

नॅशनल फार्मा प्राइसिंग अथॉरिटी (एनपीपीए) नुसार, घाऊक किंमत निर्देशांकात वाढ झाल्यामुळे औषधांच्या किंमतीत वाढ करण्यात येत आहे. कोरोना महारोगराईपासून औषध उद्योग सातत्याने औषधांच्या किमती वाढवण्याची मागणी करीत होते. शेड्यूल ड्रग्स अत्यावश्यक औषधांच्या श्रेणीत येतात आणि अत्यावश्यक औषधांच्या श्रेणीमुळे सरकार त्यांच्या किंमती नियंत्रित करते. परवानगीशिवाय त्यांच्या किंमती वाढवता येत नाहीत. परंतु, आता सरकारने या औषधांच्या किंमती वाढवण्यास परवानगी दिल्याने सर्वसामान्यांना जास्त पैसे मोजावे लागतील.

हेही वाचलंत का ? 

Back to top button