नाशिक : वाहनांवरून जिल्हा परिषदेत वादावादी ; माजी सदस्यांकडून अक्षरश: दादागिरी | पुढारी

नाशिक : वाहनांवरून जिल्हा परिषदेत वादावादी ; माजी सदस्यांकडून अक्षरश: दादागिरी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जि.प.त प्रशासक कारकीर्द सुरू झाल्यानंतर मुख्यालयातील प्रांगणात केवळ अधिकार्‍यांच्याच वाहनांना प्रवेश देण्याच्या आदेशानंतर सुरक्षारक्षकांकडून त्याचे पालन सुरू आहे. मात्र, याच आठवड्यात माजी झालेल्या सदस्यांकडून वाहने मुख्यालयात नेण्यासाठी अक्षरश: दादागिरी सुरू असल्याचे चित्र दुसर्‍या दिवशी बघावयास मिळाले. वाहनांना मुख्यालयात प्रवेश न दिल्यामुळे सुरक्षारक्षक कर्मचार्‍यांना शिवीगाळ करणे व प्रवेशद्वाराच्या बाहेरच वाहने उभे करण्याच्या प्रकारांमुळे शासकीय वाहने बाहेर नेणे व आत प्रवेश देणे यासाठी कसरत करावी लागत आहे.

जिल्हा परिषदेत 21 मार्चपासून प्रशासकीय कारकीर्द सुरू झाली आहे. त्यानंतर प्रशासनाने मुख्यालयाच्या प्रांगणात केवळ सरकारी वाहनांनाच प्रवेश देण्याचे निर्देश दिले आहेत. हे आदेश पाळताना सुरक्षारक्षकांची अक्षरश: दमछाक होत आहे. माजी झालेल्या सदस्यांना मुख्यालयात प्रवेश दिला जात नसल्याने संताप येत असून, ते या कर्मचार्‍यांवर राग व्यक्त करीत आहेत. त्यांना समजावून सांगितले तर ते एकेरीवर येऊन शिवीगाळ करतात व वाहने प्रवेशद्वारातच लावून जिल्हा परिषदेत प्रवेश करतात.

या काळात सरकारी वाहनास आत प्रवेश द्यायचा असो नाही तर आतील वाहन बाहेर घेऊन जाणे जमत नाही. यामुळे त्या माजी सदस्याचा शोध घेऊन ते वाहन बाजूला करण्यातच या कर्मचार्‍यांचा दिवस गेल्याचे चित्र होते.

हेही वाचा :

Back to top button