नाशिकमध्ये औषध विक्रेते रडारवर ; सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी महिन्याची मुदत | पुढारी

नाशिकमध्ये औषध विक्रेते रडारवर ; सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी महिन्याची मुदत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मुलांमधील अमली पदार्थांचा गैरवापर व अमली पदार्थांच्या तस्करीला प्रतिबंध करण्याच्या उद्देशाने तसेच अनुचित घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी जिल्ह्यात अमली पदार्थविरोधी कारवाई प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी सांगितले. तसेच जिल्ह्यातील औषध विक्रेत्यांनी एका महिन्याच्या आत सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत, असे आदेशही त्यांनी दिले आहेत. त्यामुळे औषध विक्रेते जिल्हा प्रशासनाच्या रडारवर आले आहेत.

शेड्युल एक्स, एच व एच 1 औषधे व इन्हेलर विकणार्‍या औषध विक्रेत्यांची अमली पदार्थविरोधी कारवाई प्रभावीपणे हाताळण्यासाठी मदत व्हावी, या हेतूने हा आदेश काढल्याचे गंगाथरन डी. यांनी स्पष्ट केले आहे. ही औषधे व इन्हेलर विकणार्‍या औषधे विक्रेत्यांनी महिनाभरात त्यांच्या दुकानांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावणे अनिवार्य आहे. हे कॅमेरे दर्शनी भागात लावावेत, अशी सूचना आहे.

जिल्हा औषध नियंत्रण विभागाने नाशिक ग्रामीण विभागातील सर्व औषध विक्रेत्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत किंवा नाही, याबाबत पडताळणी करावी. प्रशासनाकडून दिलेल्या कालावधीत सीसीटीव्ही कॅमेरे न लावणार्‍या औषध विक्रेते, दुकानदारांवर कायदेशीर कारवाईचा इशाराही आदेशात देण्यात आला आहे. या आदेशाचे पालन जिल्ह्यातील सर्व विभाग आणि नाशिक ग्रामीण हद्दीतील सर्व औषधविक्रेत्यांसाठी अनिवार्य असल्याचे गंगाथरन डी. यांनी सांगितले.

असे आहेत आदेश…
अमली पदार्थविरोधी मोहीम अधिक कठोर
शेड्युल एक्स, एच व एच 1 औषधे व इन्हेलर विक्रेत्यांना सीसीटीव्ही अनिवार्य
दुकानाच्या दर्शनी भागात लावावे लागणार कॅमेरे
23 मार्चपासून एका महिन्याची मुदत
अन्न व औषध प्रशासनामार्फत होणार पडताळणी
अंमलबजावणी न करणार्‍या औषध विक्रेत्यांवर होणार कारवाई

हेही वाचा :

Back to top button