पुसेसावळी : पुढारी वृत्तसेवा
विटा-महाबळेश्वर मार्ग दळण-वळणाच्यादृष्टीने सुखावह असला तरी बेफिकीर व मुजोर वाहनचालक, मालकांमुळे तो मृत्यूला आमंत्रण देणारा मार्ग ठरत आहे. या बेफिकीर वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जनतेतून होत आहे. बेफिकीर वाहनचालकांवर आळा बसला तर या मार्गाचा सुखद आनंद प्रवाशांना घेता येईल.
नवीनच तयार करण्यात आलेला विटा-महाबळेश्वर मार्ग सुंदर व वाहतुकीच्यादृष्टीने सुलभ बनला आहे. मात्र, प्रत्येक गावाच्या चौकाचौकात या भल्या मोठ्या रस्त्यावर वाहनचालक, फिरस्ते आपली वाहने तासन् तास उभी करतात त्यामुळे भला मोठा असलेला रस्ता वाहतुकीस अवघा 10 ते 12 फुटाचाच उरतो. गावोगावी रस्त्यात मध्यभागी वाहन लावून रहदारीची पर्वा न करणार्या फाळकूटदादांच्या संख्येतही वाढ झाली आहे. वाढत्या बेफिकीरीबरोबर या फाळकूटदादांचा बंदोबस्त करणे हेही एक आव्हानच आहे. या दोन्ही समस्यांना वेळीच आवर घातला नाही तर येणार्या काळात अनेक आव्हाने उभी राहणार आहेत.
सध्या प्रातिनिधीक स्वरुपात पुसेसावळीचे उदाहरण घेतले तर बिकट अवस्था निर्माण झाली आहे. हा रस्ता पार्किंग तळ बनला आहे. रस्त्याकडेला रात्रंदिवस उभी असलेली वाहने वाहतुकीला अडथळा ठरत आहेत. दत्त चौक तर मृत्यूचा सापळा बनला आहे. या चौकात चार दिशांनी भरधाव वेगाने वाहने येतात. त्यांच्या गतीला अडथळा नाही. त्यामुळे लहान-मोठे अपघात होत आहेत, दररोज वाहतुकीची कोंडी होत आहे. चौकात चारही बाजूला तासन् तास वाहने उभी असल्याने पादचार्यांना जीव मुठीत घेऊन चालावे लागत आहे. कर्णकर्कश हॉर्न वाजवत जाणार्या वाहनांनी ग्रामस्थांची झोप उडवली आहे. कोठेही नो-पार्किंग झोन नाही, वेग प्रतिबंधीत भाग नाही, गतिरोधकांचा तर पत्ताच नाही, अशा एक ना अनेक समस्या पुसेसावळीसह जयरामस्वामींचे वडगाव, चोराडे ते सांगली जिल्ह्यातील खेराडे वांगी, नेवरी, विटा, कळंबी, वडी, घाटमाथा, रहिमतपूर, सातारा ते महाबळेश्वरपर्यंत जाणवत आहेत. या समस्या हाताबाहेर जाण्या अगोदर त्यावर कठोर उपाययोजना करणे गरजेचे बनले आहे.
या मार्गावर प्रत्येक गावातील फूटपाथवर अतिक्रमण झाले आहे. प्रत्येक चौकात बेशिस्त पार्किंग सुरू आहे. कर्णकर्कश हॉर्नचा वापर सुरू आहे. अतिक्रमण व वाहतूक कोंडीची समस्या आहे. अनेकांना जीव गमवावा लागला आहे. याची जबाबदारी कोण घेणार? असा प्रश्न सुजाण नागरिकांना पडला आहे.