ध्वनिमर्यादेचे उल्लंघन भोवले ; नाशिकमध्ये रंगपंचमीला पाच मंडळांवर गुन्हे | पुढारी

ध्वनिमर्यादेचे उल्लंघन भोवले ; नाशिकमध्ये रंगपंचमीला पाच मंडळांवर गुन्हे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ; रंगपंचमीला पोलिसांच्या आदेशाचे उल्लंघन करणार्‍या पाच सार्वजनिक मंडळांच्या पदाधिकार्‍यांवर भद्रकाली पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. मनाई असूनही बँजो व साउंड सिस्टिम लावून ध्वनिमर्यादेचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई केली आहे.

कोरोना नियंत्रणात आल्यानंतर पोलिसांनी रंगपंचमी साजरी करण्यास परवानगी दिली. मात्र, अटी-शर्तींचे पालन करण्याचीही सूचना देण्यात आली होती. रहाड, शॉवर उभारण्यासाठी, पारंपरिक वाद्ये वाजवण्यासाठी पोलिसांची परवानगी बंधनकारक होती. मंडळांकडून वेगवेगळे ना-हरकत दाखले घेतल्यानंतर मंडळांना सोमवारी परवानगी देण्यात आली. त्यामुळे मंगळवारी (दि.22) सकाळपासून शहरात रंगोत्सवाचा उत्साह दिसून आला. रहाड आयोजकांनी पोलिसांच्या नियमांचे पालन केल्याचे पाहणीत आढळून आले. मात्र, शॉवर डान्स आयोजित केलेल्या काही मंडळांनी नियमांचे उल्लंघन केले. पारंपरिक वाद्ये वाजविण्याची परवानगी असताना मोठे स्पीकर आणि बॅन्जो लावण्यात आले होते.

त्यामुळे ध्वनिमर्यादेचे उल्लंघन केल्याने पोलिसांनी भद्रकाली परिसरातील नवजीवन मित्रमंडळ, बालाजी युवक मंडळ, प्रेरणा मित्रमंडळ, सत्यम मित्रमंडळ, नवजीवन मित्रमंडळ आणि शिवसेवा युवक मित्रमंडळ या पाच मंडळांच्या पदाधिकार्‍यांवर गुन्हे दाखल केले आहेत. मात्र, नियमांची पूर्तता करूनही गुन्हे दाखल केल्याचा दावा काही पदाधिकार्‍यांनी केला. साध्या वेशातील पोलिसांनी मंडळांकडून किंवा नागरिकांकडून नियमांचे होणार्‍या उल्लंघनाचे फोटो-व्हिडिओ मोबाइलमध्ये कैद केल्यानंतर सायंकाळी कायदेशीर कारवाई केली.

हेही वाचा :

Back to top button