नाशिक जिल्ह्यातील वडांगळी येथे जावयाची गाढवावरून धिंड ; पण का? तुम्हीच वाचा | पुढारी

नाशिक जिल्ह्यातील वडांगळी येथे जावयाची गाढवावरून धिंड ; पण का? तुम्हीच वाचा

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा

सिन्नर तालुक्यातील वडांगळी येथे ब्रिटिश काळापूर्वीपासून चालत आलेल्या रंगपंचमीला जावयाची गाढवावरून धिंड काढण्याची परंपरा आजही जोपासली जात आहे. धूलिवंदनापासून पाच दिवसांच्या प्रयत्नानंतर वडांगळीकरांना रंगपंचमीच्या दिवशी मंगळवारी (दि. 22) जावई मिळाला. यंदाच्या या आगळ्यावेगळ्या प्रथेचे मानकरी ठरले. निफाड तालुक्यातील चितेगाव येथील दौलत बाजीराव भंबारे हे बाळासाहेब यादव खुळे यांचे जावई आहेत. कोरोनामुळे जावयाची धिंड ही परंपरा खंडित झाली होती. भंबारे यांची गाढवावरून वाजतगाजत धिंड काढण्यात आली. रीतीरिवाजानुसार सुपाचे बाशिंग, कांदा लसणाच्या मंडवळ्या, गळ्यात तुटक्या चपलांचा हार, चेहऱ्याला विविध प्रकारचे रंग अशाप्रकारे जावयाला सजवून गाढवावरून बसवूज वाजतगाजत, रंगांची उधळण करत मिरवणूक काढण्यात आली.

दौलत भंबारे यांना याबाबतची पुसटशीही कल्पना नव्हती. त्यांना नाशिक येथून हिवरगाव येथे शेतजमीन पाहण्याचे कारण सांगून वडांगळीत आणण्यात आले.

गेल्या सात-आठ वर्षांपासून जावयाबरोबर गाढव मिळविणे हीदेखील मोठी समस्या निर्माण होत आहे. परंतु धनंजय खुळे, मनोज खुळे, बाळा खुळे आदींनी सायखेडा (ता. निफाड) येथून एक हजार रुपये देऊन भाडेतत्त्वावर गाढव आणले. रंगपंचमीचा दिवस आणि त्यात जावयाची धिंड म्हणजे दुग्धशर्करा योग गावकऱ्यांना अनुभवयास मिळाला. दुपारी चार वाजता सुरू झालेली मिरवणूक सायंकाळी सात वाजता मोठ्या उत्साहात पार पडली.

यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख दीपक खुळे, गिरीश खुळे, दिलीप खुळे, धनंजय खुळे, शुभम खुळे, गणेश खुळे, सचिन खुळे, अजित खुळे, विनोद खुळे, बाळू खुळे, विष्णू खुळे, सुरेश कहांडळ, मंगेश देसाई, शशिकांत खुळे, प्रदीप खुळे, प्रणव खुळे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

धिंडीनंतर जावयाचा मानपान…

जावयाला सासऱ्याच्या घरासमोर सुगंधी उटणे, साबण लावून आंघोळ घालण्यात आली. सुनीता खुळे, अनिता बकरे, आश्विनी खुळे, मंदा गायकवाड, रतनबाई खुळे, कल्याणी खुळे, नंदा खुळे आदी सुहासिनींनी लग्नाचे पारंपरिक गाणे म्हणत पाटावर जावयाला आंंघोळ घातली.

हेही वाचा :

Back to top button