सोशल मीडियावरील एक मॅसेज अन् साक्री शहर कडकडीत बंद ; वाचा काय प्रकरण आहे | पुढारी

सोशल मीडियावरील एक मॅसेज अन् साक्री शहर कडकडीत बंद ; वाचा काय प्रकरण आहे

धुळे पुढारी वृत्तसेवा : धुळे जिल्ह्यातील साक्री शहरात धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर दोन गटात झालेल्या दंगली प्रकरणात आज साक्री शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. साक्री बंदचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे सर्व व्यापाऱ्यांनी या मेसेजला प्रतिसाद देत आपले दुकाने बंद ठेवली.

साक्री शहरांमध्ये धुलीवंदनाच्या दिवशी डीजे बंद करण्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली. या प्रकरणात एका गटाकडून हल्लेखोर युवकांवर कारवाई करण्याची मागणी करत प्रशासनाला निवेदन देण्यात आले. या निवेदनामध्ये दुसर्‍या गटावर गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले. ही दंगल पूर्वनियोजित असल्याचा आरोप देखील या निवेदनात करण्यात आला. या सर्व प्रकाराची दखल घेत पोलिस प्रशासनाने कायदेशीर कारवाई केली. दोन गटातील या दंगलीमुळे शहराचे वातावरण तणावाचे तयार झाले.

पण हा तणाव निवळला असताना काल अचानक सोशल मीडियावरून साक्री शहर बंद करण्याचे आवाहन व्हायरल झाले. हा मेसेज हिंदुत्ववादी संघटनेच्या नावाने व्हायरल झाला. दरम्यान या मेसेजची दखल घेत आज साक्री शहर कडकडीत बंद पाळण्यात आला. साक्री शहरात आज सकाळपासूनच नागपूर सुरत महामार्ग लगत ची सर्व दुकाने तसेच शहरातील प्रमुख बाजारपेठेतील दुकाने व्यापाऱ्यांनी बंद ठेवून आवाहनाला प्रतिसाद दिला. दरम्यान बंदच्या पार्श्वभूमीवर कोणताही गैरप्रकार होऊ नये, यासाठी पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी साक्री शहरांमध्ये तळ ठोकला. त्याचप्रमाणे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रवीण मैराळे यांच्यासह पोलीस स्टेशनच्या सर्वच अधिकाऱ्यांनी संवेदनशील विभागांमध्ये बंदोबस्त लावला. सायंकाळपर्यंत हा बंद कडकडीत बंद पाळण्यात आला.

हेही वाचा :

Back to top button