नाशकात व्यापाराच्या संधी शोधण्यासाठी ब्रिटनच्या उच्चाधिकाऱ्यांची उद्योजकांशी चर्चा | पुढारी

नाशकात व्यापाराच्या संधी शोधण्यासाठी ब्रिटनच्या उच्चाधिकाऱ्यांची उद्योजकांशी चर्चा

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा
भारत आणि ब्रिटन यांच्यातील परस्पर व्यापार वाढविण्यासाठी तसेच गुंतवणूक करण्यात नाशकात वाव आहे काय याची चाचपणी करण्यास ब्रिटनच्या मुंबई येथील उप उच्चायुक्त कार्यालयातील दक्षिण आशियाचे व्यापार आयुक्त व पश्चिम भारताचे उप उच्चायुक्त एलेन गेमेल ओबे आणि फर्स्ट सेक्रेटरी (पॉलिटिकल) बेथ येटस् यांनी काल नाशिक भेटीच्यावेळी डोंगरे वसतिगृह येथे आयमा प्रदर्शनास भेट देऊन प्रदर्शन अध्यक्ष धनंजय बेळे आणि उद्योजकांशी चर्चा केली. इलेक्ट्रिकल व्हेईकल सेटअप उभारण्यासाठी नाशिक काय देऊ शकेल हे जाणून घेण्यासाठी त्यांनी प्रदर्शनात असलेल्या या संदर्भातील स्टॉलसला भेटीही दिल्या.
नाशकात आरोग्य आणि विशेषतः फार्मास्युटिकल क्षेत्रात ब्रिटनला अधिक स्वारस्य असल्याचे त्यांच्याशी झालेल्या चर्चेच्यावेळी निदर्शनास आले. भारत आणि ब्रिटनच्या पंतप्रधानांदरम्यान नुकत्याच झालेल्या वर्च्युअल बैठकीनुसार परस्पर सामंजस्य करारानुसार मेट्रो पेक्षाकमी दर्जाच्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यास ब्रिटन उत्सुक असून त्या अनुषंगानेसुद्धा यावेळी त्यांनी उद्योजकांशी चर्चा करून त्यांच्याकडून याबाबत फीडबॅक घेत त्यांना मुंबईला येण्याचे निमंत्रणही दिले.
ज्येष्ठ उद्योजक रविंद्र महादेवकर, धनंजय बेळे, हर्षद ब्राह्मणकर, निखिल पांचाळ, हर्षद बेळे, दिलीप वाघ, राजेंद्र कोठावदे, गोविंद झा, मनीष रावळ, योगिता आहेर आदींनी चर्चेत भाग घेऊन नाशिकमध्ये औद्योगिक क्षेत्रातील उत्पादनांची त्यांना माहिती दिली. नाशकात वाईन इंडस्ट्री आहे. येथे विविध क्षेत्राच्या उद्योगवाढीसाठी अनुकूल वातावरण असून ब्रिटन सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झाल्यास येथे रोजगारनिर्मितीला चालना मिळेल तसेच परस्पर व्यापार विषयक संबंधही अधिक वृद्धिंगत होतील असा विश्वास धनंजय बेळे यांनी यावेळी व्यक्त केला. बेळे आणि पदाधिकाऱ्यांच्या हस्ते यावेळी ब्रिटिश पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला.

हेही वाचा :

Back to top button