सांगली: हरिपूरमध्ये आरटीओ एजंटचा खून | पुढारी

सांगली: हरिपूरमध्ये आरटीओ एजंटचा खून

सांगली पुढारी वृत्तसेवा : हरिपूर येथील सुरेश आण्णाप्पा नांद्रेकर (वय 43, रा. गजानन कॉलनी) हे दुचाकीवरून निघाले असता त्यांच्यावर कुर्‍हाड आणि लोखंडी रॉडने सोमवारी रात्री उशिरा प्राणघातक हल्ला करण्यात आला. त्यांना वाचविण्यासाठी मध्ये पडलेल्या त्यांच्या पत्नी निमिशा यांच्यावरही वार झाले. उपचार सुरू असताना सुरेश यांचा मंगळवारी पहाटे मृत्यू झाला. निमिशा या गंभीर असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.

पोलिसांनी याप्रकरणी निखील सुभाष साळुंखे (वय 21, रा. हरिपूर) किरण हणमंत घस्ते (25, रा. मालू हायस्कूलजवळ, हरिपूर रोड, सांगली), दत्ता यलाप्पा खांडेकर (19, रा. कवलापूर), विजय सदाशिव पाटील (23, रा. गरवारे कॉलेजवळ, सांगली) या चौघा संशयितांना अटक करण्यात आली आहे. दुचाकी व्यवहारातून हा प्रकार झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

घटनास्थळावरून आणि पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सुरेश हे येथील आरटीओ कार्यालयात येणार्‍या नागरिकांना विविध प्रकारची कामे करून देत होते. त्यांच्या ओळखीचे हरिपूर येथील सागर पाटील यांच्याकडून संशयित गस्ते याने पैसे घेतले होते. त्या बदल्यात गस्ते याची दुचाकी पाटील याने घेऊन ती सुरेश नांद्रेकर यांच्याकडे ठेवण्यासाठी काही दिवसांपूर्वी दिली होती.

गस्ते याने “माझी दुचाकी सुरेश याच्याकडे का दिली आहे”, असे म्हणून सागर पाटील यांच्याबरोबर वाद घातला होता. त्यानंतर “आमचे पैसे परत दे आणि दुचाकी घेऊन जा” असे पाटील यांनी सांगितले होते. मात्र त्यानंतर या दुचाकीची चोरी झाली. त्यावर गस्ते याने “मला माझीच दुचाकी हवी” असा तगादा लावला. त्यातून गस्ते आणि सुरेश यांच्यात वाद वाढला होता.

सुरेश आणि निमिशा हे दोघे सोमवारी सायंकाळी सांगलीत आले होते. त्यानंतर ते हरिपूर येथील बागेतील गणपती मंदीर येथे दर्शनासाठी गेले होते. तेथून उशिरा दुचाकीवरून घरी जात होते. त्यावेळी दोघांनी त्यांची दुचाकी अडवली व हल्ला केला.

एकाने कुर्‍हाडीने आणि दुसर्‍याने रॉडने सुरेश यांच्यावर वार केले. त्यामुळे दोघे पती-पत्नी दुचाकीवरून खाली पडले. सुरेश यांच्यावर वार होत असताना निमिशा या मध्ये पडल्या. त्यामुळे त्यांच्याही चेहरा आणि डोक्यात वार झाले. सुरेश यांच्यावर दहा ते पंधरा वार झाले आहेत.
निमिशा यांनी आरडा-ओरडा केल्याने परिसरातील लोक पळत आले. दोघांनाही तातडीने येथील सिव्हील रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना पहाटे सुरेश यांचा मृत्यू झाला. त्यांना शिवाणी आणि सायली या दोन मुली आहेत.

दरम्यान खुनी हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस उपअधीक्षक अजित टिके, पोलिस निरिक्षक शिवाजी गायकवाड यांच्यासह पोलिस पथकाने सोमवारी रात्रीपासूनच तपास सुरू केला. चार संशयितांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी करण्यात येत असून खुनातील हत्यारे जप्त करण्यात आली आहेत. निमिशा यांचा जबाब घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संशयितांकडून पाळत ठेवून हल्ला

गस्ते आणि सुरेश यांच्यात वाद झाल्यानंतर गस्ते याच्या मनात सुरेश यांच्याविषयी राग होता. त्यातून त्याने सुरेश यांचा काटा काढण्याचा कट रचला. सोमवारी दिवसभर तो सुरेश यांच्यावर पाळत ठेवून होता. सायंकाळी ते बाहेर पडल्यानंतर हल्लेखोर मागावर होते. दोघांनी हल्ला केल्यानंतर इतर दोघे दुचाकीवर तयारीत होते. त्या दुचाकीवरून ते पसार झाले.

Back to top button