International Day of Forests : आदिवासी भागाला सागाचे आच्छादन | पुढारी

International Day of Forests : आदिवासी भागाला सागाचे आच्छादन

नाशिक : नितीन रणशूर ; नाशिक, पेठ, हरसूल आणि दिंडोरी या आदिवासी भागांत वनमहोत्सवाअंतर्गत वनविकास महामंडळाच्या पुढाकारातून सुमारे ३७५ हेक्टर क्षेत्रामध्ये सागाचे रोपण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी साग या प्रजातीचे ८ लाख ४३ हजार ७५० रोपांची लागवड केल्या. जिल्ह्यातील राखीव वनक्षेत्र नव्याने साग लागवडीखाली आली आहे. त्यामुळे आदिवासी भागाला सागाचे आच्छादन लाभले आहे.

वनविकास महामंडळाकडून वृक्षारोपणासाठी बहुतेकदा साग या वृक्षाची लागवड केली जाते. सन २०२० मध्ये कोरोनाच्या वाढत्या संसर्गाने वृक्षारोपण मोहिमेला ब्रेक लागला होता. त्यामुळे कुठेही व्यापक स्वरूपात वृक्षारोपण माेहीम राबवता आली नव्हती. मात्र, सन २०२१ मध्ये कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याने प्रादेशिक वनविभागासह सामाजिक वनीकरण विभागाच्या बरोबरीने महामंडळाने वृक्षारोपणाची मोहीम हाती घेतली होती.

वनमहोत्सवाअंतर्गत साग लागवडीवर नाशिक एफडीसीएमकडून भर देण्यात आला होता. त्यासाठी मखमलाबाद येथील रोपवाटिकेत सागझडी अर्थात साग स्टॅम्पची निर्मिती करण्यात आली होती. लागवडीसाठी वनविकास महामंडळाकडून पावसाळापूर्व कामाअंतर्गत खड्डे खोदण्यात आले होते. पावसाचा जोर वाढल्यानंतर पेठ व हरसूल परिसरात २८५ हेक्टरवर, तर नाशिक तालुक्यात ५० आणि दिंडोरी तालुक्यात ४० अशा ३७५ हेक्टरवर रोपण करण्यात आले आहे. यंदा पाऊसही चांगला झाल्याने ही राखीव वनक्षेत्रे चांगलीच बहरली आहेत.

दरम्यान, इमारतीच्या उत्तम बांधकामासह बहुपयोगी ठरणाऱ्या सागाच्या लाकडाची मागणी वाढत असल्याने सागाच्या प्रमाणित बियांचे संकलन करून त्याची विक्री एफडीसीएमकडून केली जाते. गेल्या वर्षी २५ हजार किलो बियांचे संकलन करण्यात आले होते. तर बियांच्या विक्रीतून ७२ लाख, तर सागझडीच्या विक्रीतून महामंडळाच्या तिजोरीत ६५ लाखांची भर पडली आहे. चांगले उत्पन्न मिळत महामंडळाने सागझडी निर्मिती तसेच बियां संकलनावर लक्ष केंद्रित केले आहे.

साडेसात लाख सागझडीची विक्री

साग लागवडीला सर्वसामान्य शेतकऱ्यांकडून प्राधान्य दिले जात असल्याने सागझडी व बियांची मागणी वाढली आहे. गेल्या वर्षभरात नाशिक एफडीसीएमने साडेसात लाख सागझडींची विक्री केली आहे. त्यापैकी यावल उपवनसंरक्षक कार्यालयाने अडीच लाख सागझडींची खरेदी केली होती. सागझडीच्या विक्रीतून ६५ लाखांचे उत्पन्न मिळाले.

गेल्या काही वर्षांपासून वनविकास महामंडळाकडून आदिवासी भागात सागाची लागवड केली जात आहे. यंदाच्या वनमहोत्सवात ३७५ हेक्टरवर नाशिक विभागीय वनविकास महामंडळाकडून साग प्रजातीचे वृक्षरोपण केले आहे. आगामी काळातही साग लागवड केली जाणार असून, बियांचे संकलन सुरू आहे.

-प्रवीण ढमाळ, वनक्षेत्रपाल,

वनविकास महामंडळ, नाशिक

हेही वाचा :

Back to top button