नाशिक : अभिनव भारत मंदिर विकास निधीवरून खासदार-आमदारांमध्ये श्रेयवाद | पुढारी

नाशिक : अभिनव भारत मंदिर विकास निधीवरून खासदार-आमदारांमध्ये श्रेयवाद

नाशिक :  पाच कोटींचा निधी मंजूर केल्याचा खा. गोडसेंचा दावा…

अभिनव भारत मंदिराच्या विकासकामांसाठी राज्य शासनाच्या पर्यटन मंत्रालयाने पाच कोटींचा निधी मंजूर केला आहे. यामुळे आता स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या तिळभांडेश्वर लेनमधील अभिनव भारत मंदिराचे रुपडे पूर्णत: बदलणार आहे. स्वातंत्र्याच्या लढ्यातील इतिहासाचा साक्षीदार असलेल्या मंदिराला नव्याने झळाळी मिळणार असल्याची माहिती खा. हेमंत गोडसे यांनी दिली.

स्वा. सावरकर यांचे तिळभांडेश्वर लेनमध्ये निवासस्थान आहे. सन 1899 ते सन 1909 या दरम्यान दहा वर्षे स्वातंत्र्यवीर सावरकर याठिकाणी वास्तव्यास होते. याठिकाणी वास्तव्यास असताना सावरकर यांनी अभिनव भारत संस्थेची स्थापना करून अनेक आंदोलनांचे रणशिंग फुंकले. शहरातील अभिनव भारत मंदिर संस्थेचे सूर्यकांत रहाळकर यांच्यासह अनेक हिंदुत्ववादी संस्थांच्या पदाधिकार्‍यांनी तसेच सावरकरप्रेमींनी खा. गोडसे यांना सावरकरांच्या अभिनव भारत मंदिराचे आधुनिकीकरण करण्याचे साकडे घातले होते. गोडसे यांनी राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन सावरकरांच्या अभिनव भारत मंदिराच्या विकासकामासाठी पाच कोटींचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. पर्यटन मंत्रालयाने प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत पाच कोटी रुपयांचा निधी नुकताच मंजूर केला आहे.

निधी आणण्यावरून आ. फरांदे यांचा खासदारांवर निशाणा..

अभिनव भारत मंदिराच्या विकासासाठी पाच कोटींचा निधी मंजूर करून आणल्याचा दावा खा. हेमंत गोडसे यांनी केला. त्यावर मध्य विधानसभा मतदारसंघाच्या भाजप आ. देवयानी फरांदे यांनी खासदारांवर निशाणा साधत गोडसेंनी न केलेल्या कामाचे श्रेय घेण्यापेक्षा लोकांची कामे करण्याचा सल्ला दिला आहे.

यासंदर्भात गोडसे यांनी निवेदन प्रसिध्द करताच त्यास आ. फरांदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. नाशिक येथील अभिनव भारत मंदिराचे नूतनीकरणाची मागणी 1968 मध्ये स्वा. सावरकर यांनी केली होती. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारा हा विषय माझ्या प्रयत्नातून मार्गी लागल्याचा दावा आ. फरांदे यांनी केला. या प्रकल्पासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात एक कोटींचा निधी दिला गेला व त्याचे कार्यारंभ आदेश देऊन काम प्रगतिपथावर असल्याची बाब फरांदे यांनी निदर्शनास आणून दिली. अभिनव भारत मंदिराला अतिरिक्त पाच कोटींचा निधी मिळावा म्हणून मी मागणी केली. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत याबाबतचा प्रस्ताव 18 मे 2018 रोजी दिला. त्या प्रस्तावाच्या अनुषंगाने कामाला पाच कोटींच्या निधीसाठी पाठपुरावा सुरू होता. अधिवेशनात देखील ना. आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन निधीची मागणी करण्यात आली. परंतु, अभिनव भारत मंदिर ट्रस्टला भेटदेखील न देता मंजूर झालेल्या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न गोडसेंनी केल्याचा आरोप आ. फरांदे यांनी केला आहे.

हेही वाचा :

Back to top button