फेरीवाल्यांचे नियोजन करा, अन्यथा…, मालेगावी माजी आमदार शेख यांचा ठिय्या | पुढारी

फेरीवाल्यांचे नियोजन करा, अन्यथा..., मालेगावी माजी आमदार शेख यांचा ठिय्या

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा ; जनता दलाच्या आंदोलनानंतर अतिक्रमणमुक्त झालेल्या किदवाई रोड, भंगार बाजारातील फेरीवाले, लहान व्यावसायिकांना आगामी शब्ब ए बारात, रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर शाळा क्रमांक एक 14 च्या क्रीडांगणावर तात्पुरत्या स्वरूपात व्यवसाय करण्यास मुभा द्यावी अन् भविष्यातील कायमस्वरूपी पर्यायी व्यवस्थेचे नियोजन करावे, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगर जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार आसिफ शेख यांनी महापालिका प्रशासनाला दोन दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे. आयुक्तांची भेट होऊ न शकल्याने त्यांची प्रतीक्षेत महापालिका मुख्यालयाबाहेर बसकन मारत रोष व्यक्त केला.

गेल्या आठवड्यात जनता दलाने भंगार बाजारातील व्यावसायिकांनी व्यापलेला रस्ता मोकळा करावा, या मागणीसाठी ठिय्या आंदोलन केले होते. त्याची दखल घेत मनपाने अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवत रस्ता खुला केला. या कारवाईमुळे प्रभावित झालेल्या व्यावसायिकांना घेऊन माजी आमदार शेख यांनी गुरुवारी (दि.17) सकाळी शहर पोलिस ठाण्यात गार्‍हाणे मांडले. त्यानंतर मनपा मुख्यालयात गेले. आयुक्त भालचंद्र गोसावी अनुपस्थित असल्याने त्यांनी मुख्यालयाबाहेरच ठिय्या दिला. सुरक्षारक्षकांची अटकाव केल्याचा त्यांनी आरोप केला. शब्ब ए बारातनंतर रमजानपर्व सुरू होईल, या काळात स्वस्तातील वस्तू खरेदीसाठी ग्राहक भंगार बाजार, किदवाई रस्त्यावर येत असतात. यातून मोठा रोजगार उपलब्ध होतो.

हे अर्थकारण दोन्ही घटकांसाठी महत्त्वपूर्ण असल्याने रस्त्यावरील व्यावसायिकांना जवळील शाळा क्रमांक 14 मध्ये तात्पुरत्या स्वरूपात जागा द्यावी, रस्त्यावर अडथळा होणार नाही अशा पद्धतीने मुभा द्यावी, तसेच फेरीवाल्यांचे कायमस्वरूपी पुनवर्सनाचा आराखडा तयार करावा, अशी मागणी त्यांनी नोंदवली. याबाबत नियोजनासाठी त्यांनी प्रशासनाला दोन दिवसांचा वेळ दिला, त्यात समाधानकारक कार्यवाही न झाल्यास आयुक्तविरुद्ध व्यावसायिक असा संघर्ष अटळ असल्याचा इशारा दिला. उपआयुक्त राजू खैरनार यांनी केलेली शिष्टाई नाकारण्यात आली.

आयुक्तांवर रोष
वादग्रस्त तत्कालीन आयुक्त त्र्यंबक कासार यांच्याप्रमाणेच विद्यमान आयुक्तांवरही मुख्यालयात कमी वेळ आणि मोठ्या ठेकेदारांमध्ये अधिक स्वारस्य असा आरोप माजी आमदार शेख यांनी केला. अतिक्रमण विभागाचे बीट मुकादम वसुली करत फिरतात, फेरीवाल्यांचे नियोजन न झाल्यास हे मुकादम कसे फिरतात, असा संकेतात्मक इशाराही यावेळी देण्यात आला.

Back to top button