नगर : अल्‍पवयीन मुलीच्या विवाहप्रकरणी तिघांविरूध्द गुन्हा दाखल | पुढारी

नगर : अल्‍पवयीन मुलीच्या विवाहप्रकरणी तिघांविरूध्द गुन्हा दाखल

कर्जत; पुढारी वृत्‍तसेवा : नगर तालुक्यातील निबोडी येथील अल्पवयीन मुलीचा विवाह कर्जत तालुक्यातील तोरकडवाडी येथील युवकाशी लावून देण्यात आला. या प्रकरणी कर्जत पोलीस स्टेशनमध्ये कृष्णा छगन साळुंखे (रा. निंबोडी तालुका नगर), दादा अर्जुन गोरे, अर्जून गोरे (रा. तोरकडवाडी, ता. कर्जत) या तिघांच्या विरोधात बाल विवाह कायदा कलम ९,१०,११ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी की, नगर तालुक्यातील निंबोडी या गावातील शेतमजूर कृष्णा छगन साळुंखे हे ऊस तोडणी करण्यासाठी कर्जत तालुक्यातील तोरकडवाडी येथे आले होते. यावेळी त्यांची ओळख अर्जुन गोरे यांच्यासोबत झाली. यातून तिथेच या अल्पवयीन मुलीचा विवाह लावण्याचा निर्णय झाला. हा निर्णय आर्थिक बाब समोर ठेवून झाला आहे का हे मात्र समजू शकले नाही.

7 जानेवारी 2022 या दिवशी पीडित मुलगी व दादा अर्जून गोरे यांचा विवाह कर्जत तालुक्यातील तोरकडवाडी येथे गोरे यांच्या घरामध्ये साध्या पद्धतीने एकमेकांना हार घालून झाला.

या विवाहानंतर जी घटना निंबोडी येथे नातेवाइकांना समजली. त्यानंतर त्यांनी तात्काळ भिंगार नगर येथील पोलीस स्टेशनमध्ये याबाबत माहिती समक्ष हजर राहून सांगितली. त्यानंतर त्यांनी हे प्रकरण बाल न्यायालयाकडे कळविले असता, न्यायालयाने तोरकडवाडी येथील ग्रामसेवकांना या प्रकरणात संबंधित व्यक्तींच्या विरोधात कर्जत पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद देण्याबाबत सूचना दिली.

त्यानुसार ग्रामसेवक जालिंदर गणपत पठाडे यांनी कर्जत पोलीस स्टेशन मध्ये 17 मार्च या दिवशी रात्री उशिरा फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून नवरा, सासरा आणि पीडित मुलीचे वडील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अद्याप कोणासही अटक झालेली नाही.

Back to top button