नाशिक : चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके स्मारकाला लवकरच पुनर्वैभव | पुढारी

नाशिक : चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके स्मारकाला लवकरच पुनर्वैभव

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ; चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके स्मारकाला लवकरच पुनर्वैभव प्राप्त होणार असून, कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या एनडीज् आर्ट वर्ल्ड ही संस्था पीपीपी तत्त्वावर फिल्मसिटीच्या धर्तीवर या प्रकल्पाचा पुनर्विकास करणार आहे. महापौर सतीश कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली गेल्या आठवड्यात झालेल्या शेवटच्या महासभेत जादा विषयातील प्रस्तावाला मंजुरी देण्यात आल्याने या प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला आहे.

मराठी चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या स्मृती जपण्यासाठी महापालिकेने 1999 मध्ये पाथर्डी परिसरात 29 एकर जागेवर फाळके स्मारकाची उभारणी केली. कालांतराने या स्मारकाची दुर्दशा झाल्याने नाशिककर आणि पर्यटकांनीही या प्रकल्पाकडे पाठ फिरविली. स्मारकाला गतवैभव प्राप्त होण्याच्या दृष्टीने प्रकल्पाचे नूतनीकरण करण्याची मागणी होती. त्यानुसार महापौरांनी महापालिकेतील शेवटच्या महासभेत या संदर्भातील प्रस्तावाला जादा विषयात मंजुरी देण्यात आली.

प्रकल्पाच्या जागेत पर्यटन, चित्रीकरण, विविध स्वरूपाचे प्रशिक्षणदेखील दिले जाणार आहे. स्मारकाच्या पुनर्विकासासाठी महापालिकेने स्वारस्य देकार मागविले होते. त्यात एनडीज् आर्ट वर्ल्डचे देकार पात्र ठरल्याने ते स्वीकारण्यास हरकत नसल्याची शिफारस मनपा पॅनलवरील आर्किटेक्ट देवरे-धामणे यांनी प्रशासनाला केली होती. त्यानुसार प्रशासनाच्या प्रस्तावाला महासभेने मंजुरी दिली. सद्यस्थितीत महापालिकेला प्रकल्पातून दरवर्षी सरासरी 53 लाखांचा तोटा होत आहे. गेल्या 20 वर्षांत महापालिकेला या प्रकल्पातून 10.60 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे.

मनपाला आठ कोटी स्वामित्वधन
फाळके स्मारकाच्या पुनर्विकासासाठी सुमारे 18 ते 20 कोटींचा खर्च एनडीज् आर्ट वर्ल्डतर्फे अपेक्षित धरला असून, प्रस्तावात तसे म्हटले आहे. प्रकल्पाचा पुनर्विकास झाल्यानंतर त्यातून मिळणारे उत्पन्न 30 वर्षे मुदतीसाठी एनडीज् आर्ट वर्ल्डला मिळणार आहे. 30 वर्षांच्या कालावधीत महापालिकेला स्वामित्वधनापोटी 8 कोटी 37 लाख रुपये मिळणार आहेत.

हेही वाचा :

Back to top button