धुळे : होळी, शिव जयंतीच्या पार्श्वभूमीवर आठ जणांना शहरात मनाई आदेश | पुढारी

धुळे : होळी, शिव जयंतीच्या पार्श्वभूमीवर आठ जणांना शहरात मनाई आदेश

धुळे पुढारी वृत्तसेवा ; होळी आणि धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर धुळ्याच्या आझादनगर परिसरातील आठ जणांना 16 ते 21 मार्च दरम्यान शहरात शिरकाव करण्यास मनाई करण्याचे आदेश पोलीस प्रशासनाने दिले आहेत. यात भारतीय जनता पार्टीच्या विद्यमान नगरसेवकांचा समावेश आहे.

धुळे शहरातील आझादनगर पोलीस ठाण्याच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार या आठ जणांना मनाई आदेश करण्यात आले. गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण देशात कोरोनाचा उपद्रव असल्यामुळे सण आणि उत्सव एकत्रितपणे साजरे करता आले नाही. धुळ्यात देखील दोन वर्षात कोणताही सण साजरा झालेला नसल्यामुळे यंदा होळी आणि धुलीवंदन तसेच तिथीप्रमाणे शिवजयंतीचा सण साजरा करण्यास शासनाने मुभा दिली आहे.

या अंतर्गतच हे सण आणि उत्सव साजरे करण्यासाठी सर्व जाती-धर्माची नागरिक घराबाहेर पडणार आहेत. यापूर्वी धुळे शहरात सण उत्सव काळात उपद्रवी लोकांचे स्वयंघोषित ग्रुप व टोळ्यांपासून घडणाऱ्या अनुचित प्रकार आणि संभाव्य धोका टाळण्यासाठी व धुळ्याची शांतता व कायदा सुव्यवस्था टिकून ठेवण्यासाठी आझादनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक आनंद कोकरे यांनी उपद्रवी टोळ्यांवर कारवाई केली होती.

यावर्षी देखील पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलिस अधिकारी दिनकर पिंगळे यांनी दिलेल्या सूचनेनुसार या वर्षीदेखील खुणी मशिद भागातील देवा सोनार उर्फ देवेंद्र चंद्रकांत सोनार, प्रशांत उर्फ टिंग्या प्रकाश बडगुजर व बबलू उर्फ अरुण दिनेश बडगुजर, गायकवाड चौकातील फायटर ग्रुपचा नाना साळवे उर्फ ज्ञानसागर विठ्ठल साळवे तसेच परदेशी ग्रुपचा विकी महादेव परदेशी, संतोष रवींद्र परदेशी, शिवशक्ती ग्रुपचा अध्यक्ष मंगल गिरधर गुजर तसेच मनोहर चित्र मंदिर परिसरातील सनी संजय वाडेकर यांना शहरात मनाई आदेश जारी करण्यात आले आहे. सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रांत यांनी या संदर्भात काढलेल्या आदेशानुसार 16 ते 21 मार्च दरम्यान या सर्व आठ जणांना शहरांमध्ये प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे.

हेही वाचा :

Back to top button