

मोशी : पुढारी वृत्तसेवा : पुणे- नाशिक महामार्गावर इंद्रायणी नदी पुलाखाली मोशी गावची स्मशानभूमी असून, या ठिकाणी क्रियाकर्मासाठी येणार्यांच्या अंगावर पुलावरून ये-जा करणार्यांकडून टाकलेला कचरा, निर्माल्य पडते.
दोन पुलांमधील तुटलेल्या जाळीची दुरुस्ती करण्यास पिंपरी – चिंचवड महापालिकेस वेळ नसल्याने ही समस्या उद्भवत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
मोशी स्मशानभूमीचा काही भाग पुणे- नाशिक महामार्गावरील इंद्रायणी नदीपुलाखाली येतो. येथे दोन पूल उभारण्यात आले आहेत. त्या पुलांमधील रिकाम्या जागेत बसविलेल्या जाळीची दुरवस्था झाली आहे.
या रिकाम्या जागेतून पुलावरून जाणारे काही नागरिक निर्माल्य; तसेच कचर्याच्या पिशव्या टाकतात.यामध्ये नारळासारख्या कठीण वस्तू असतात. त्यामुळे स्मशानभूमीत आलेल्यांच्या अंगावर तसेच डोक्यावर हा कचरा पडतो.
अंत्यविधीस अथवा क्रियाक्रर्मास उपस्थितांच्या अंगावर कचरा अथवा निर्माल्य पडणे लज्जास्पद गोष्ट असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. रात्रीच्यावेळी पुलावरून जाणारे मद्यपीदेखील दारूच्या रिकाम्या बाटल्या या मोकळ्या भागातून खाली टाकतात.
मात्र खाली स्मशानभूमीत अंत्यविधीला आलेल्या नागरिकांच्या डोक्यात या बाटल्या,पिशव्यांतील कचरा अंगावर पडतो. एखाद्या नागरिकांच्या डोक्यात कठीण पदार्थ पडून त्याच्या जीवितास धोका निर्माण होवू शकतो.
त्यामुळे दोन्ही पुलामधील रिकाम्या भागात पत्रे अथवा जाळी लावून हा भाग बंदिस्त केला जावा, अशी मागणी होत आहे; मात्र महापालिकेचे या प्रकाराकडेे दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.