मालेगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा : काश्मिरी पंडितांच्या विस्थापनावर आधारित 'द कश्मीर फाइल्स' हा सिनेमा देशातील सात राज्यांमध्ये करमुक्त झाला असताना मालेगावातील सिनेरसिकांना मात्र हा चित्रपट थिएटरमध्ये पाहण्यासाठी निवेदन प्रपंच करावा लागत आहे. मालेगाव ही मॉलीवूडनगरी म्हणूनही प्रसिद्ध आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रेक्षक असताना या चित्रपटाचे प्रदर्शन का रोखण्यात येतेय, यावरून सोशल मीडियात जोरदार चर्चा झडत आहे.
विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित 'द कश्मीर फाइल्स' हा सिनेमा 11 मार्चला प्रदर्शित झाला. सिनेमा पाहून प्रेक्षक भावुक होत असल्याचे व्हिडिओ आणि बातम्या व्हायरल होत आहेत. त्यामुळे मालेगावातील प्रेक्षकांमध्येही उत्सुकता वाढलेली आहे. मात्र, अद्यापही शहरातील एकाही चित्रपटगृहात हा चित्रपट प्रदर्शित होत नसल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे.
हरियाणा, गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, त्रिपुरा, गोवा आणि उत्तर प्रदेश या सात राज्यांत हा सिनेमा करमुक्त करण्यात आला आहे. मग, मालेगावातच का प्रदर्शन रोखले, यावरून प्रेक्षक चित्रपटगृह चालकांना जाब विचारत आहेत. त्यातून निर्माण झालेल्या वादंगात राजकीय पक्षांनी उडी घेतल्याने आता प्रशासन बॅकफूटवर गेल्याचे दिसते. सिनेरसिक आणि राजकीय पक्षांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर एका चित्रपटगृह व्यवस्थापनाने बुधवारी (दि.16) हा सिनेमा लावण्याची तयारी केली आहे. दिवसा सकाळी दोनच शो चे नियोजन असू शकते. सणांच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय संदेशावरून या चित्रपटाचे प्रदर्शन करणे थोडे लांबणीवर पडल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, यावरून सायंकाळी राजकीय श्रेयवाद सुरू झाला.
भाजप आंदोलनाच्या पवित्र्यात…
भाजयुमोच्या शिष्टमंडळाने हा चित्रपट प्रदर्शित करावा, या मागणीचे निवेदन 'संदेश सिनेमॅक्स'ला दिले होते. त्यानंतरही संचालकांनी प्रतिसाद न दिल्याने मंगळवारी (दि.15) भाजप जिल्हाध्यक्ष सुरेश निकम यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने छावणी पोलिस ठाण्यात धाव घेतली. इतिहासाची माहिती देणार्या सिनेमापासून वंचित ठेवण्याचा हेतूपुरस्सरपणे प्रयत्न होत आहे. भारतीयांच्या भावना जोडलेला एखादा विषय जाणून घेण्याचा प्रत्येकाला अधिकार असून, तो डावलण्याचा प्रकार सिनेमागृह आणि प्रशासनाकडून सुरू असल्याचा आरोप करण्यात आला. बुधवारी चित्रपट प्रदर्शित न झाल्यास आंदोलन छेडण्याचा निवेदनाद्वारे देण्यात आला. याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष अॅड. मंजूषा काजवाडकर, देवा पाटील, हरिप्रसाद गुप्ता, भरत पोफळे, देवीदास कुवर, रविष मारू, हेमंत पूरकर, सुधीर जाधव, सुनील शेलार, पप्पू पाटील, श्याम गांगुर्डे, राहुल पाटील, शक्ती सोर्दे, सचिन बाचकर आदी उपस्थित होते.
तिसरी घटना…
यंत्रमागनगरी, मोलमजुरांचे शहर असलेल्या मालेगावात एकेकाळी 10 ते 15 चित्रपटगृहे हाउसफूल चालायची. ही संख्या काळाच्या ओघात कमी झाली असली तरी सिनेरसिकांचा उत्साह आजही पाहायला मिळतो. तो कधी कधी अतिरेकी ठरतो. आवडत्या कलाकाराच्या 'एंट्री'ला फटाक्यांची आतषबाजी करणार्या टवाळखोरांची याठिकाणी कमी नाही. यावरून सिनेमागृह सील करण्यापासून संबंधितांवर गुन्हे दाखल होण्याचे प्रकार घडत असतात. त्यामुळे हे अतिउत्साही प्रेक्षक नेहमीच व्यवस्थापन आणि प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत आले आहेत. संवेदनशील शहर अशी प्रतिमा असल्याने चित्रपटांच्या कथानकावरही प्रशासनाला नजर ठेवावी लागते. यातूनच 'बॉम्बे', 'गदर' असे चित्रपट मालेगावकरांना पाहता आलेले नाहीत. आता हीच वेळ 'द कश्मीर फाइल्स'च्या बाबतीत घडत असल्याचा सूर उमटत आहे.