कराड : प्रभाग रचना रद्दमुळे इच्छुकांचा हिरमोड | पुढारी

कराड : प्रभाग रचना रद्दमुळे इच्छुकांचा हिरमोड

कराड : पुढारी वृत्तसेवा
नगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर प्रारूप प्रभाग रचना गत आठवड्यात जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे त्यादृष्टीने राजकीय घडामोडींना वेग येऊन मोर्चेबांधणीला सुरूवात झाली होती. मात्र राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी आदेश देत जाहीर झालेला प्रभाग रचनेचा कार्यक्रम रद्द केला. त्यामुळे इच्छूकांचा हिरमोड झाला असून प्रभाग रचनेनुसार प्लॅनिंग करणार्‍या राजकीय गटांना ब्रेक घ्यावा लागला आहे. त्यांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

राज्यातील नगरपालिका निवडणूकीसाठी प्रारूप प्रभाग रचनेचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला होता. त्यानुसार जिल्ह्यातील आठही पालिकांच्या प्रारूप प्रभाग रचनेस जिल्हाधिक़ारी शेखर सिंह यांनी मंजुरी दिली होती. त्यानंतर 10 ते 17 मार्चपर्यंत या प्रभाग रचनेवर हरकती व सूचनाही मागवण्याचे काम सुरू होते. मात्र निवडणूक आयोगाने ही प्रभाग रचना रद्द केली असल्याने इच्छूकांची कोंडी झाली आहे. प्रारूप आराखडे तयार झाल्यानंतर बहुतेक इच्छुकांना त्याची अनाधिकृत माहिती दोन महिन्यांपूर्वीच मिळाली होती. त्यानुसार इच्छूकांनी आराखडेही तयार केले होते.

अनेकांनी संभाव्य प्रभागातील नागरिकांच्या भेटीगाठी घेणे, जनसंपर्क वाढवणे सुरू केले होते. विविध शिबिरे राबवणे, आघाड्यांकडे वशिला लावणे सुरू केले होते. आघाड्यांच्या नेत्याकडे आपले वजन राहण्यासाठी अनेकांनी नेत्यांच्या जवळच्या लोकांपर्यंत संपर्क वाढवला होता. मात्र प्रभाग रचना जाहीर झाल्याने व निवडणूका लांबणीवर पडल्याने इच्छुकांमध्ये नाराजी पसरली आहे. प्रभागात नेतृत्व करण्यासाठी गुढग्याला बाशिंग बांधून तयार आहेत. मात्र सातत्याने निवडणुका पुढे ढकलत चालल्या असल्याने वेळ आणि पैसा वाया जात आहे. -प्रतिभा राजे

Back to top button