सातारा : तब्बल 715 दिवसांनंतर कोरोना शून्यावर | पुढारी

सातारा : तब्बल 715 दिवसांनंतर कोरोना शून्यावर

सातारा ; विशाल गुजर : जिल्ह्यात कोरोनाचा शेवट आल्याची परिस्थिती झाली आहे. कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला, त्यानंतर जिल्ह्यात तब्बल 715 दिवसांनंतर बाधितांचा आकडा शून्यावर आला आहे. आतापर्यंत झालेल्या तीन लाटांमध्ये सुमारे पावणे तीन लाख बाधित रुग्ण आढळले आहेत. सध्या कोरोना उपचार घेणार्‍यांची संख्या कमी असल्याने आरोग्य यंत्रणेसह जिल्हावासीयांना दिलासा मिळाला आहे.

जिल्ह्यात 23 मार्च 2020 रोजी दुबईवरून आलेली खंडाळ्याची महिला बाधित आढळली. दि. 28 रोजी कॅलिफोर्निया येथून आलेल्या खेडच्या वृद्धाचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून बाधितांचा वाढणारा आकडा आता कमी झाला आहे. बाधित कमी झाले असताना रिकव्हरी रेट मात्र मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

जिल्ह्यात अवघे 49 रुग्ण उपचार घेत असले तरी प्रत्यक्षात हॉस्पिटलमध्ये मात्र केवळ 4 जण आहेत. जिल्ह्याचा रिकव्हरी रेट 98 टक्के झाला असून, सातारा जिल्हा कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावर पोहचला आहे. जिल्ह्यात कोरोनाच्या पहिल्या लाटेत 39 हजार बाधित आढळले तर 900 जणांचा मृत्यू झाला होता. 2021 मधील फेब्रुवारीपासून दुसरी लाट सुरु झाली. यामध्ये जवळपास दोन लाख रुग्णांची नोंद झाली. तर साडे चार हजार लोकांचा मृत्यू झाला.

काही दिवसांचा दिलासा मिळताच ओमायक्रॉन या विषाणूने डोके वर काढल्याने जानेवारी 2022 मध्ये कोरोनाची तिसरी लाट धडकली. मात्र, प्रशासन सतर्क झाल्याने व लाट कमी असल्याने जानेवारी महिन्यात 23 हजार 324 जणांना कोरोनाचा लागण झाली. यामधील 91 जणांचा कोरोनाने बळी गेला.

फेब्रुवारीच्या सुरुवातीपासून कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला आहे. बाधित आकडा शून्याच्या घरात आला तर कोरोनामुक्ती बाधितांच्या दुप्पट झाली आहे. पॉझिटिव्हिटी रेट हा 1 टक्केच्या घरात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 2 लाख 79 हजार 149 जण बाधित आढळले आहेत. त्यातील 2 लाख 71 हजार 717 जणांनी कोरोनावर मात केली आहे. आजपर्यंत 6 हजार 681 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्याच्या घडीला 49जण उपचार घेत असले तरी त्यातील फक्त 4 जण हॉस्पिटलमध्ये आहेत.

दरम्यान, पॉझिटिव्हीटी रेट 10 टक्क्यांच्या खाली व रिकव्हरी रेट 95 टक्केवर असलेल्या 14 जिल्ह्यातील निर्बंध राज्य सरकारने शिथील केले. सातारा जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट 1 टक्क्यांच्या खाली व रिकव्हरी रेट हा 97 टक्केच्यावर राहिल्यानेच सातारा जिल्हा निर्बंधमुक्त झाला आहे. निर्बंध शिथिल झाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

ऐन उन्हाळ्यात होणारा जत्रा यात्रांचा हंगाम जोरदार होणार आहे. त्यामुळे अनेक रोजगार उपलब्ध होवून लॉकडाऊन व कोरोनात होरपळलेल्या लोकांना दिलासा मिळणार आहे.

योग्य नियोजनानेच कोरोना आटोक्यात

कोरोनामुळे जग होरपळत असताना सातार्‍यातही परिस्थिती काही वेगळी नव्हती. परंतु, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्यासह आरोग्य यंत्रणेने पहिल्या लाटेपासून योग्य नियोजन केल्याने बाधितांची संख्या आटोक्यात राहण्यास मदत झाली.

पहिल्या लाटेत अनुभव नसताना रुग्णांवर उपचार केले, तर दुसर्‍या लाटेत बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटरची मोठ्या प्रमाणात सोय केली. त्यामुळे इतर जिल्ह्यांंच्या तुलनेत सातार्‍याचा मृत्यू दर कमी राहिला. तिसर्‍या लाटेची तीव्रता कमी होती. परंतु, तरीही प्रशासन सतर्क झाले होते. तिसर्‍या लाटेतही जे गृहविलगीकरणात आहेत, त्यांचीही काळजी घेतली गेली.

Back to top button