नाशिक : दुहेरी खून प्रकरणातील तिघांच्या कोठडीत पुन्हा वाढ | पुढारी

नाशिक : दुहेरी खून प्रकरणातील तिघांच्या कोठडीत पुन्हा वाढ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नानासाहेब कापडणीस व डॉ. अमित कापडणीस या पिता-पुत्राच्या खून प्रकरणात अटकेत असलेल्या तिघा संशयितांच्या पोलिस कोठडीत गुरुवार (दि.17) पर्यंत वाढ करण्यात आली आहे. या तिघांकडूनही महत्त्वाचे पुरावे संकलित करण्यासाठी पोलिसांनी न्यायालयाकडे तिघांच्या पोलिस कोठडीची मागणी केली आहे.

विकास हेमके (26, रा. मखमलाबाद रोड), सूरज मोरे (29, रा. मधुबन कॉलनी, मखमलाबाद) व प्रदीप शिरसाठ (35, रा. इंद्रनगरी, कामटवाडे) अशी या तिघा संशयितांची नावे आहेत. कापडणीस यांच्याकडील कोट्यवधी रुपयांची मालमत्ता हडप करण्याच्या हेतूने संशयित राहुल जगताप (35, रा. जुनी पंडित कॉलनी) याच्यासह इतर तिघांनी कट रचून कापडणीस पिता-पुत्राचा खून करून त्यांच्या मृतदेहांची विल्हेवाट लावली.

त्यानंतर संशयितांनी कापडणीस यांचे शेअर्स विक्री करून पैशांचे व्यवहार केले. त्याचप्रमाणे आलिशान वाहन, महागडे मोबाइल खरेदी केले. दरम्यान, गुन्हा उघडकीस येताच पोलिसांनी राहुलला अटक केली. त्यानंतर तिघांना अटक केली. सूत्रांच्या माहितीनुसार, तिघा संशयितांकडून पोलिसांनी कापडणीस यांच्या मालमत्तेच्या चाव्या हस्तगत केल्याचे समजते.

हेही वाचा :

Back to top button