पंचवटी : पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील तब्बल 35 लॉजिस्टिक पार्क मंजूर केले आहेत. यात महाराष्ट्रातील मुंबई, नागपूर आणि नाशिक या 3 शहरांचा समावेश आहे. या लॉजिस्टिक पार्कमुळे नाशिककरांना रोजगाराच्या संधी असून, सुमारे 15 ते 20 हजार जणांना रोजगार उपलब्ध होणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय ग्रामविकास व पंचायतराज मंत्री कपिल पाटील यांनी केले.
मुंबई-आग्रा महामार्गालगत आडगांव शिवारातील 100 एकर जागेवर महापालिकेच्या वतीने उभारण्यात येणार्या लॉजिस्टिक पार्कच्या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री जयकुमार रावल, महापौर सतीश कुलकर्णी, आ. अॅड. राहुल ढिकले, आ. देवयानी फरांदे, आ. सीमा हिरे, गणेश गिते, लक्ष्मण सावजी, सुनील केदार, विजय साने, गिरीश पालवे, बाळासाहेब सानप आदी उपस्थित होते.
प्रारंभी प्रमुख पाहुणे व मान्यवरांच्या उपस्थितीत मंत्रोच्चाराच्या जयघोषात विधिवत भूमिपूजन करण्यात आले. यानंतर महापौर कुलकर्णी यांनी ना. पाटील यांचे तर सभापती गिते यांनी माजी मंत्री रावल यांचे स्वागत केले. यावेळी महापौर कुलकर्णी, आ. ढिकले, राजेंद्र फड यांनीही मनोगत व्यक्त केले.
यावेळी नगरसेविका रंजना भानसी, अरुण पवार, उद्धव निमसे, शीतल माळोदे, पूनम सोनवणे, सुरेश खेताडे, प्रशांत जाधव, हेमंत शेट्टी, प्रियंका माने, मच्छिन्द्र सानप, जगदीश पाटील आदी नगरसेवकांसह सोमनाथ बोडके, धनंजय माने, विशाल जेजुरकर आदी भाजपा पदाधिकारी व नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
शेती व्यवसायाला फायदा
नाशिक, लासलगाव आणि जळगावातील शेतकरी द्राक्षे, कांदे आणि केळी भिवंडीतील कोल्ड स्टोरेजमध्ये आणतात. भविष्यात नाशिकचे लॉजिस्टिक पार्क तयार झाले तर हेच शेतकरी याठिकाणी येतील आणि येथील कोल्ड स्टोरेज वापरतील. त्यांचाही येण्याजाण्याचा खर्च वाचेल. त्यामुळे नाशिकच्या शेतमाल निर्यातीसाठीही मदत होणार असून, शेतकरी आणि शेती व्यवसायाला फायदा होणार आहे.
फडणवीसांना हेतुपुरस्सर नोटीस
देवेंद्र फडणवीस हे भाजपचे सक्षम नेतृत्व असून, त्यांनी राज्याच्या विकासाला नवी दिशा दिली आहे. विरोधी पक्षनेते म्हणून त्यांना असलेल्या अधिकारांचा वापर करून त्यांनी जनतेसमोर सत्य आणलेले आहे. त्यांना हेतुपुरस्सर नोटीस दिलेली आहे. मात्र यातून काहीही निघणार नाही. राजकारणात असे घडणेही चुकीचे आहे, असेही ना. पाटील यांनी सांगितले.