धुळे : उद्योग आणले, रोजगार मिळाला; लोककलेद्वारे महाविकास आघाडीचा जागर | पुढारी

धुळे : उद्योग आणले, रोजगार मिळाला; लोककलेद्वारे महाविकास आघाडीचा जागर

धुळे पुढारी वृत्तसेवा : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने गेल्या दोन वर्षात केलेल्या कामगिरीबरोबरच शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लोककलेच्या माध्यमातून धुळे जिल्ह्यात जागर सुरू झाला असून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ‘ऐका…,ऐका…ऐका बरं…का…तुम्ही शासनाच्या योजना, असा जागर लोककलांच्या माध्यमातून सुरू आहे.

राज्यातील महाविकास आघाडी शासनाला नुकतीच दोन वर्ष पूर्ण झाली असून त्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यातील चार तालुक्यांमध्ये लोककलेच्या माध्यमातून व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. या जनजागृतीसाठी शासनमान्य यादीवरील लोककला पथकांमधील श्री सदगुरू सांस्कृतिक कला बहुउद्देशीय संस्था, धुळे, महात्मा फुले कृषक मंडळ व बहुउद्देशीय संस्था, तऱ्हाडी, श्रमिक बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या नटराज कला पथकाचे कलावंत आपापल्या लोककलेच्या माध्यमातून शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती ग्रामस्थांना देत आहेत.

महात्मा फुले कृषक मंडळाने आतापर्यंत अर्थे, भटाणे, तऱ्हाडी, बोराडी, करवंद, अजंदे, पळासनेर, रोहिणी, तोंदे, होळनांथे, भाटपुरा येथे, सदगुरू कला पथकाने आतापर्यंत बळसाणे, नेर, कुसुंबा, मेहेरगाव, फागणे, काळखेडे, मुकटी, तर  नटराज कला पथकाने म्हसदी, कासारे, पिंपळनेर येथे कार्यक्रम सादर केले आहेत. पोवाडा, भारुड, गोंधळ, सवाल- जबाबाच्या माध्यमातून ही पथके शासनाच्या योजनांची प्रसिध्दी करीत आहेत.
याबरोबरच कलापथके मुख्यमंत्री ठाकरे यांचा,

‘माझ्या महाराष्ट्रातील बांधवांनो,
भगिनींनो आणि मातांनो,
आपल्या आशीर्वादामुळेच आम्ही हे करू शकलो.
आपले धन्यवाद…
उद्योग आणले, रोजगार मिळाला,
आपला महाराष्ट्र बळकट झाला,
याबद्दल धन्यवाद, कोरोनाचा कोप झाला, रात्रीचा दिवस केला,
उपचार झाले, लस आली, ऑक्सिजन निर्माण केला,
तुमचे आरोग्य राखू शकलो याबद्दल धन्यवाद…
हा संदेश सुद्धा गावागावांत पोहोचवित आहेत.

या योजनांमध्ये प्रामुख्याने राज्य शासनाची महत्वाकांक्षी शिवभोजन योजना, कोरोनामुळे बाधित रुग्णांवर शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत केले उपचार, आरोग्य यंत्रणांचे केले बळकटीकरण, शेतकऱ्यांसाठी विकेल ते पिकेल अभियान, महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, इमारत बांधकाम कामगारांना कोरोना काळात प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत,  कामगार विभागातर्फे घरेलू कामगारांना मदत, रिक्षा चालकांना मदत, कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांना पाच लाख रुपयांची मदत, माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार कोरोनामुळे मयत झालेल्या नागरिकांच्या नातलगांना प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण मोहिमेला गती दिली, मोफत अन्नधान्य आदी योजनांची माहिती देण्यात येत आहे.

हेही वाचा :

Back to top button