सोलापूर : यांत्रिक झाडूने होणार शहरात रस्तेसफाई | पुढारी

सोलापूर : यांत्रिक झाडूने होणार शहरात रस्तेसफाई

सोलापूर पुढारी वृत्तसेवा: शहरातील प्रमुख रस्त्यांची स्वच्छता येत्या एप्रिलपासून यांत्रिक झाडूने (रोड स्वीपर) करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली.

अनेक वर्षांपूर्वी शहरातील प्रमुख मार्ग यांत्रिक झाडूने स्वच्छ करण्याचे काम महापालिकेकडून केले जात असे, पण काही वर्षांनी यांत्रिक झाडूत बिघाड झाल्याने स्वच्छतेचे काम मॅन्युअल पद्धतीने सुरू झाले. मॅन्युअल पद्धतीने रस्त्यांची स्वच्छता नीट होत नाही. त्यामुळे शहरात धुळीचे प्रमाण वाढीस लागले आहे.

या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने पुनःश्च यांत्रिक झाडूने स्वच्छतेचे काम एजन्सीमार्फत करवून घेण्याचे ठरविले आहे. यासंदर्भातील प्रस्ताव सर्वसाधारण सभेने मंजूर केला आहे. यामुळे प्रशासनाने मक्ता निश्चिती व वर्कऑर्डरचे सोपस्कर पूर्ण केले आहे. येत्या एप्रिलपासून या कामास सुरुवात होणार आहे.

घंटागाडीबाबत फेरनिविदा

शहरातील घरगुती कचरा घंटागाड्यांद्वारे उचलण्यासाठी मजूर पुरविण्यासंदर्भातील फेरनिविदा काढण्यात येणार आहे. यासंदर्भातील प्रशासनाच्या प्रस्तावावर सर्वसाधारण सभेने हरकत घेऊन फेरनिविदा काढण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार लवकरच फेरनिविदा काढण्यात येणार आहे. रस्त्यावरची अतिक्रमणे पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने काढण्याची मोहीम लवकरच बेैठक घेऊन राबविण्यात येणार आहे, असेही आयुक्तांनी सांगितले.

‘तो’ ठराव विखंडनासाठी शासनाकडे पाठविणार

सात रस्ता येथील परिवहन डेपोच्या जागेत महापालिकेचे पेट्रोल पंप सुरू करण्याचा प्रशासनाचा प्रस्ताव महापालिका सर्वसाधारण सभेने नामंजूर केला होता. यावर हा ठराव विखंडनासाठी शासनाकडे पाठविण्यात येणार आहे, असे आयुक्तांनी सांगितले.

इंधन कंपनीकडून केवळ पेट्रोल पंपाचे बांधकातम होणार आहे. तद्नंतर एजन्सीमार्फत पंप चालविण्यात येईल. याद्वारे प्रति लिटर कमिशनरुपाने महापालिकेला उत्पन्न मिळेल, असेही ते म्हणाले.

Back to top button