पुढारी ऑनलाईन डेस्क : पश्चिम बंगालमध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या दोन्ही जागांवर निवडणूक लढविण्यासाठी तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी उमदेवारांच्या नावाची घोषणा केली आहे. माजी केंद्रीय मंत्री शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha) आसनसोल या लोकसभा मतदारसंघातून पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरणार असून बालीगंज विधानसभा मतदारसंघातून बाबुल सुप्रियो निवडणूक लढवतील.तर १२ एप्रिलरोजी मतदान होणार असून १६ एप्रिल रोजी मतमोजणी होणार आहे
आसनसोल लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर निवडून आलेले बाबुल सुप्रियो यांनी मागील वर्षी खासदार पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर भाजपला सोडचिठ्ठी देत त्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे रिक्त झालेल्या आसनसोल लोकसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. दरम्यान, बाबुल सुप्रियो २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत आसनसोल लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर निवडून आलेले आहेत.
कोलकातानंतर आसनसोल हे पश्चिम बंगालमधील दुसरे मोठे शहर आहे. आसनसोल लोकसभेची जागा आधी काँग्रेस आणि नंतर सीपीएमच्या ताब्यात होती. परंतु २०१४ मध्ये येथील राजकीय समीकरणे बदलली. मोदी लाटेत बाबुल सुप्रियो पहिल्यांदाच खासदार म्हणून निवडून आले. त्यानंतर त्यांनी टीएमसीच्या डोला सेन यांचा पराभव केला. बालीगंज विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुब्रत मुखर्जी यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. दक्षिण कोलकातामधील बल्लीगंज हा राज्यातील महत्वपूर्ण मतदारसंघ आहे. मागील तीन टर्म हा मतदारसंघ टीएमसीच्या ताब्यात आहे.
टीएमसीच्या तिकीटावर सुब्रत मुखर्जी २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत बालीगंज मतदारसंघातून विजयी झाले होते. त्यांनी भाजपचे लोकनाथ चटर्जी यांचा ७५ हजार ३५९ मतांनी पराभव केला होता. मात्र,४ नोव्हेंबररोजी वयाच्या ७५ वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.
हेही वाचलंत का ?
पहा व्हिडिओ : चला दख्खनचा राजा जोतिबाचा महिमा ऐकूया : महिमा श्री केदारलिंगाचा…