पेटीएमचे संस्थापक विजय शर्मा यांना अटक व जामिनावर सूटका ! मागच्या महिन्यातील प्रकार | पुढारी

पेटीएमचे संस्थापक विजय शर्मा यांना अटक व जामिनावर सूटका ! मागच्या महिन्यातील प्रकार

नवी दिल्ली पुढारी वृत्तसेवा : भरधाव मोटारकार चालवून दिल्ली पोलीस दलातील अधिकाऱ्याच्या गाडीला टक्कर मारल्याप्रकरणी गेल्या महिन्यात पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांना अटक झाली होती, अशी माहिती समोर आली आहे. 22 फेब्रुवारी रोजी घडलेल्या या घटनेनंतर शर्मा यांना जामिनावर सोडण्यात आले होते.
विजय शर्मा यांनी आपल्या ताब्यातील जग्वार लँड रोव्हर मोटारकार भरधावपणे चालवून दिल्ली पोलीस दलातील उपायुक्त बेनिता मेरी जेकर यांच्या गाडीला धडकवली होती. मदर इंटरनॅशनल स्कूलसमोर हा प्रकार घडला होता.

उपायुक्त जेकर यांच्या गाडीचा चालक अरविंदो मार्गावरील पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी गेला होता, त्यावेळी विजय शर्मा यांनी जेकर यांच्या गाडीला धडक मारून पळ काढला होता.
मात्र जेकर यांच्या गाडीच्या चालकाने शर्मा यांच्या गाडीचा नंबर टिपून घेतला होता. उपायुक्त जेकर यांनी सदर घटनेबाबत मालवीय नगर ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
पोलिस तपासात संबंधित कार गुरुग्राममधील एका कंपनीच्या नावावर आणि विजय शर्मा यांच्या ताब्यात असल्याचे स्पष्ट झाले होते. यानंतर शर्मा यांना पोलिसांनी अटक केली होती. नंतर त्यांना जामिनावर सोडूनही देण्यात आले होते.
हेही वाचा

Back to top button