राज्यात सत्तांतराची शक्यता नाही : रामदास आठवलें | पुढारी

राज्यात सत्तांतराची शक्यता नाही : रामदास आठवलें

धुळे, पुढारी वृत्तसेवा : राज्यात सरकार पडण्यासारखी सध्यातरी तशी कोणतीही परिस्थिती नाही. पण उद्या राजकारणात काहीही घडू शकते. राजकीय स्थितीमध्ये बदल होऊन सरकार पडलेच, तर भारतीय जनता पार्टी आणि रिपाई युती सरकार बनवण्याच्या तयारीत असल्याचे सूतोवाच आज (शुक्रवार) केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athavale) यांनी धुळ्यात केले. यावेळी त्यांनी काँग्रेस व शिवसेनेला चिमटा काढला. देशात राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँगेसला आता यश मिळणार नाही, असे सांगतानाच आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात शिवसेनेला ३ जागाही मिळणे अवघड होईल, असे आठवले यांनी म्हटले आहे. धुळे जिल्ह्यात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी एका मेळाव्यानिमित्त हजेरी लावली. त्यानंतर विश्रामगृहावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

आठवले (Ramdas Athavale) म्हणाले की, राज्यामध्ये दोन-तृतीयांश संख्याबळ असल्याशिवाय सत्तांतर होणार नाही. पण शिवसेना किंवा राष्ट्रवादी यांनी भारतीय जनता पार्टीला पाठिंबा दिल्यास किंवा काँग्रेसने पाठिंबा काढल्यास सरकारला धोका होऊ शकतो. परंतु, सध्या तशी परिस्थिती नाही. राज्यात भाजपा महायुतीचे सरकार येईल, असे वाटत नाही. पण महाविकास आघाडीचे सरकार पडलेच, तर सरकार बनवण्याची तयारी असल्याचे सुतोवाच त्यांनी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने आठ वर्षात केलेल्या कामाची पावती म्हणून चार राज्यात लोकांनी त्यांना साथ दिली आहे. पंजाब राज्यात अकाली दल भारतीय जनता पार्टी सोबत आले असते. तर आपकडे गेलेली सत्ता कदाचित भाजपकडे असती, असेही त्यांनी सांगितले. शेतकरी कायद्यांचे आंदोलनामध्ये पंजाबचा सहभाग मोठा होता. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी यांच्या भावनांचा विचार करून हे कायदे मागे घेतले.

आगामी जिल्हा परिषद पंचायत समित्या जिंकण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि रिपाई आघाडी यांच्या वतीने सर्व प्रकारचे प्रयत्न होत आहेत. तर मुंबई महापालिकेची निवडणूक देखील जिंकण्याची तयारी सुरू आहे. गेल्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ८२ जागा जिंकल्या होत्या. आता बहुमतापर्यंत जाण्यास अडचण येणार नाही, असेही त्यांनी सांगितले. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ही भारतीय जनता पार्टी सोबतच राहणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.

देशात काँग्रेसची अवस्था ना घर का ना घाट का अशी असून काँग्रेसला काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात त्यांच्या पक्षाला यश मिळेल, असे वाटत नाही. काँग्रेसने उत्तर प्रदेशामध्ये प्रियंका गांधींचा प्रयोग करून पाहिला. पण हा प्रयोग फसला आहे. काँग्रेसला आता गांधी परिवारातील नेतृत्वावर विश्वास राहिला नाही. त्यांनी नेतृत्वात बदल करणे आवश्यक आहे. त्यामुळे आता महायुतीला काँग्रेसची भीती नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचलंत का ? 

पहा व्हिडिओ : विधानसभा निवडणूक : भाजपाचा विजय आणि काँग्रेसचा पराभव नेमका कशामुळे

Back to top button