परभणी : पिस्तूलाचा धाक दाखवून पेट्रोलपंप चालकास १ लाखास लुटले | पुढारी

परभणी : पिस्तूलाचा धाक दाखवून पेट्रोलपंप चालकास १ लाखास लुटले

मानवत; पुढारी वृत्तसेवा : मानवत ते रूढी रस्त्यावर असलेल्या कैलास पेट्रोलपंपावरील कामगारास पिस्तूलाचा धाक दाखवून दुचाकीस्वारांनी १ लाख रुपये लुटले. ही घटना गुरुवारी (दि. १०) रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली. यानंतर तिघा अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

याबाबत अधिक माहिती अशी की, येथील माजी नगरसेवक पद्माकर गोलाईत यांचा मानवत-परभणी या राष्ट्रीय महामार्गावर रूढी शिवारात कैलास नावाचा पेट्रोलपंप आहे. गुरुवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास भीमाशंकर दळवे व दत्ता भिसे हे पेट्रोलपंपमधील रूमवर जेवण करीत असताना एक दुचाकी पेट्रोल भरण्यासाठी आली. यावेळी भीमाशंकर ढवळे याने दुचाकीमध्ये २०० रुपयाचे पेट्रोल भरले.

यानंतर दुचाकीवर मागे बसलेले दोघेजण खाली उतरले. यातील एकाने पँटच्या खिशातून पिस्तूल काढले. पिस्तूलाचा धाक दाखवत ढवळे याच्या खिशातील ५०० रुपयांचे २ बंडल असे एकूण १ लाख रुपये घेऊन दुचाकीवरून परभणीकडे पोबारा केला.

सदरील घटनेनंतर भीमाशंकर ढवळे याने आरडाओरडा केली असता पेट्रोलपंप रूममध्ये असलेले पेट्रोलपंप मालक पद्माकर गोलाईत, दत्ता भिसे, व पंढरीनाथ मोरे यांनी धाव घेतली. सर्वानी कारने यशवाडीपर्यंत दुचाकीस्वारांचा पाठलाग केला. परंतु, चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले.

याप्रकरणी मुनीम भीमाशंकर ढवळे यांच्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास फौजदार भारत जाधव करीत आहेत.

हेही वाचलंत का? 

Back to top button