धुळे : उपमहापौर पदासाठी भाजप नगरसेवकाचा आत्महत्येचा इशारा | पुढारी

धुळे : उपमहापौर पदासाठी भाजप नगरसेवकाचा आत्महत्येचा इशारा

धुळे, पुढारी वृत्तसेवा : धुळे महानगरपालिकेच्या उपमहापौर पदाच्या उमेदवारीवरून भाजप नगरसेवक नागसेन बोरसे यांनी बंडाचा झेंडा उभारला आहे. महानगरपालिकेतील भ्रष्टाचार वेळोवेळी बाहेर काढत असल्यामुळे आपल्याला उमेदवारी नाकारण्यात आली आहे. तरी शनिवार (दि.१२) पर्यंत पक्षाने याबाबत निर्णय न घेतल्यास आत्महत्या करण्याचा इशारा देखील बोरसे यांनी दिला आहे.

धुळे महानगरपालिकेच्या उपमहापौर पदाचा भगवान गवळी यांनी राजीनामा दिल्यामुळे ही जागा रिक्त होती. दरम्यान, या पदावर भारतीय जनता पार्टीकडून नागसेन बोरसे यांना संधी मिळणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र, आज भाजपकडून अनिल नागमोते यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याने आज खासदार डॉ. सुभाष भामरे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, महापौर प्रदीप करपे, स्थायी समितीचे माजी सभापती संजय जाधव, नगरसेवक हिरामण गवळी आदींच्या उपस्थितीत नागमोते यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

या प्रकारामुळे भाजपाचे नगरसेवक नागसेन बोरसे हे कमालीचे संतप्त झाले. यानंतर त्यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी भाजपावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले. आपण नगरसेवक झाल्यापासून पक्षाने दिलेले आदेश वेळोवेळी पाळले आहेत. तरीही वरिष्ठांनी शब्द देऊन देखील आपल्याला उपमहापौर पदासाठी संधी दिली गेली नाही. मी वेळोवेळी महानगरपालिकेतील भ्रष्टाचार सभागृहामध्ये बाहेर काढत असल्याने मला संधी दिली गेली नाही.

महानगरपालिकेचा ५० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प हा तुटीचा असताना देखील ५ कोटी रुपये शिलकीचा सादर केला. त्याला मी विरोध केला. त्यामुळे देखील मला उपमहापौरपदाची संधी नाकारली गेली. हा प्रकार आपण कदापि खपवून घेणार नाही. महानगरपालिकेतील सर्व काळे धंदे बाहेर काढेल आहेत. तसेच महापालिकेत आतापर्यंत झालेला भ्रष्टाचार उजागर करेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. त्याचप्रमाणे माघारी पूर्वी पक्षाने निर्णय न घेतल्यास आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे.

हेही वाचलंत का ? 

पहा व्हिडिओ : विधानसभा निवडणूक : भाजपाचा विजय आणि काँग्रेसचा पराभव नेमका कशामुळे

Back to top button