नाशिक मनपा : आजची महासभा ठरणार आभाराचीच! | पुढारी

नाशिक मनपा : आजची महासभा ठरणार आभाराचीच!

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ; नाशिक महापालिकेच्या चालू पंचवार्षिकची मुदत दि.14 मार्चला संपुष्टात येत असल्याने गुरुवारी (दि.10) होणारी महापालिकेची महासभा ही शेवटची ठरणार आहे. त्यातही प्रशासनाने धोरणात्मक आणि विकासकामांचे प्रस्तावच सादर न केल्याने इतिवृत्त मंजुरीसह महासभा आभाराचीच ठरणार आहे. महासभा ऑफलाइन घेण्याची मागणी महापौरांनी केली. परंतु, ही मागणीदेखील प्रशासनाने फेटाळून लावली.

मनपाच्या सहाव्या पंचवार्षिकचा कालावधी 14 मार्च रोजी संपुष्टात येत आहे. खरेतर महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी महिन्यातच होणे अपेक्षित होते. परंतु, प्रभागरचनेचा घोळ आणि ओबीसी आरक्षण यामुळे निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. कालावधी संपत असल्याने राज्य शासनाने परिपत्रक काढून मनपावर प्रशासक म्हणून आयुक्त कैलास जाधव यांची नियुक्ती केली आहे. प्रशासकीय राजवट लागू होण्यापूर्वीच महापौर सतीश कुलकर्णी यांनी गुरुवारी (दि.10) तहकूब महासभा बोलावली असून, या सभेनंतर लगेचच नियमित महासभा घेतली जाणार आहे. या शेवटच्या महासभेत सन 2015-16 या वर्षातील सिंहस्थ कुंभमेळ्यासह विविध कामांमधील तब्बल 255 कोटींच्या आक्षेपांचा समावेश असलेल्या स्थानिक निधी लेखा परीक्षण अहवालावर चर्चा होऊ शकते. शेवटची महासभा असल्याने त्यात अनेक विकासकामे तसेच धोरणात्मक विषयांचे प्रस्ताव येतील, अशी शक्यता होती. मात्र, प्रशासनाने प्रशासकीय राजवटीची घोषणा होताच सर्वच प्रस्तावांना ब्रेक लावला आहे.

काही सदस्यांनी महासभेत काही प्रकरणांच्या चौकशांचे प्रस्ताव सादर केले आहेत. मात्र, प्रशासन असे प्रस्ताव किती गांभीर्याने घेणार यावर संंबंधित प्रस्तावांचे भवितव्य अवलंबून आहे. कोरोनाचे निर्बंध सर्वच खुले झाल्याने महासभा ऑफलाइन घ्यावी, अशी मागणी महापौर सतीश कुलकर्णी यांनी प्रशासनाकडे केली. परंतु, राज्य शासनाचे ऑफलाइन सभा घेण्याबाबतचे आदेश नसल्याने महासभा ऑनलाइनच घेण्याची सूचना प्रशासनाने केली आहे. त्यामुळे महासभा ऑनलाइनच होणार असल्याने सत्ताधारी भाजपचा हिरमोड झाला आहे.

प्रशासनाची भोजनासही नकारघंटा
शेवटची महासभा असल्यामुळे प्रथेप्रमाणे सदस्यांसह अधिकार्‍यांना सुग्रास भोजन देण्याची सूचना महापौरांनी प्रशासनाला केली. परंतु, ऑनलाइन महासभा असल्याने भोजनव्यवस्था करता येणार नसल्याची नकारघंटा प्रशासनाने वाजविली आहे. यामुळे शेवटची महासभा असूनही सत्ताधारी भाजपला नगरसेवकांना भोजन देता येणार नाही. यामुळे स्नेहभोजनाचा गोडवाही सत्ताधार्‍यांसह विरोधकांना चाखता येणार नाही.

14 पासूनच
प्रशासकीय राजवट
दि. 14 मार्चपासून प्रशासकीय राजवट सुरू होणार असून, मनपाची सर्व सूत्रे आयुक्त कैलास जाधव यांच्या हाती जाणार आहेत. 14 मार्च 2017 पासून महापौरांचा कार्यकाळ सुरू झाला होता. त्यामुळे 13 मार्चच्या मध्यरात्रीपासून महापौरांना कार्यकाळ संपुष्टात येणार आहे.

हेही वाचा :

Back to top button