एलियन्सना अनेकवेळा पाहिल्याचा ‘तिचा’ दावा | पुढारी

एलियन्सना अनेकवेळा पाहिल्याचा ‘तिचा’ दावा

न्यूयॉर्क :  जगभरातून एलियन्स म्हणजेच परग्रहवासी आणि त्यांची ‘यूफो’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या यानांबाबत अनेक दावे केले जात असतात. परग्रहवासीयांचे अस्तित्व आहे की नाही हे अद्यापही विज्ञानाने स्पष्ट केलेले नाही. मात्र, एलियन्सबाबत अनेक भन्नाट दावेही होतच असतात. आता एका महिलेने म्हटले आहे की तिने एलियन्सना एकदा नव्हे तर अनेकवेळा पाहिले आहे. हॉलीवूडच्या ‘अवतार’ चित्रपटातील निळ्या व्यक्तिरेखांसारखे ते दिसतात असे तिचे म्हणणे आहे.

अमेरिकेच्या मिसौरी प्रांतात राहणार्‍या या महिलेचे नाव आहे लिली नोवा. 2020 मध्ये कोरोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात आपण एलियन्सना पहिल्यांदा भेटल्याचे तिने म्हटले आहे. तिने सांगितले, रात्री मी पाय मोकळे करण्यासाठी बाहेर पडलो असताना जवळच एक तीव्रप्रकाश  दिसून आला. आधी मला वाटले की हे एखादे विमान असावे; पण लक्षपूर्वक पाहिल्यावर मला धक्काच बसला. ती एक ‘यूफो’ होती. काही महिन्यांनंतर माझी पुन्हा एकदा एलियन्सची गाठ पडली.

पहिल्यांदा मी हलक्या निळसर रंगाची त्वचा असलेल्या एका मुलीला पाहिले. ती अतिशय सुंदर होती; पण तिच्या डोक्यावर केस नव्हते. तिच्यासमवेत तिचे अन्यही काही साथीदार होते. दुसर्‍या वेळीही अशा अनेक एलियन्सना पाहिले ज्यांची त्वचा चमकत होती आणि डोळे निळे होते. आता तर त्यांची नेहमीच भेट होते व ते टेलिपॅथीच्या माध्यमातून आपल्याला त्यांच्या प्रतिमाही पाठवतात असा तिचा दावा आहे. आपले भय दूर व्हावे यासाठी ते अशा प्रतिमा पाठवत असल्याचेही तिचे म्हणणे आहे.

 

Back to top button