नाशिक : बापलेकाचा खून केल्यानंतर चौघांमध्ये पार्टी, पैशांचे वाटप | पुढारी

नाशिक : बापलेकाचा खून केल्यानंतर चौघांमध्ये पार्टी, पैशांचे वाटप

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : पंडित कॉलनी येथील कापडणीस पिता-पुत्र खून प्रकरणात सरकारवाडा पोलिसांनी औरंगाबाद येथून आणखी तीन संशयितांना अटक केली आहे. विकास हेमके, प्रदीप शिरसाठ व सूरज मोरे अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. या तिघा संशयितांसह राहुल जगतापने मिळून कट रचून नानासाहेब कापडणीस व डॉ. अमित कापडणीस यांचा थंड डोक्याने व क्रूर पद्धतीने खून केल्याचे पोलिस तपासात समोर येत आहे. या तिघांना सोमवारपर्यंत (दि.14) पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

कापडणीस पिता-पुत्रांचे खून केल्यानंतर त्यांचे शेअर विक्री करून आलेल्या पैशांमधून चौघा संशयितांनी जबाबदारीनुसार पैशांचे वाटप केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. तर डॉ. अमितचा खून केल्यानंतर त्याच्याच घरात चौघांनी दारू पिल्याचे स्पष्ट झाले आहे. दुहेरी खून केल्यानंतर चौघा संशयितांनी जास्तीत जास्त वेळ सोबत घालवला. मात्र, पिता-पुत्र बेपत्ता झाल्याची नोंद होताच चौघेही सतर्क झाले व पोलिसांना जबाब देऊन राहुलव्यतिरिक्त इतर तिघे इंदोर येथे पसार झाले. तेथून ते नांदेड व औरंगाबाद येथे थांबल्याचे पोलिसांनी सांगितले.

नानासाहेब व डॉ. अमित कापडणीस यांचा खून करण्यासाठी राहुल जगताप, विकास हेमके, प्रदीप शिरसाठ व सूरज मोरे यांनी कट रचला. नानासाहेब यांचा 16 डिसेंबरला गिरणारे येथे नेऊन गळा दाबून मारहाण करीत खून केला. त्यानंतर त्यांच्या मृतदेहाची विल्हेवाट पालघर जिल्ह्यातील मोखाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत लावली. डॉ. अमितचा 26 डिसेंबरला पंडित कॉलनीतील त्याच्याच घरात चौघा संशयितांनी मिळून खून केला. खून केल्यानंतर चौघांनी घरातच पार्टी केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. त्यानंतर चौघांनी डॉ. अमितचा मृतदेह कारमध्ये टाकून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी जागा शोधली. अखेर त्यांनी अहमदनगर जिल्ह्याच्या वेशीवर डॉ. अमितचा मृतदेह टाकला. गुन्हा उघडकीस आल्यानंतर संशयितांनी सरकारवाडा पोलिसांना दोन दिवस जबाब दिले व त्यानंतर ते फरार झाले. अटकपूर्व जामिनासाठी त्यांनी न्यायालयात प्रयत्नही केल्याचे समजते. शेअर्स विक्रीतून आलेल्या पैशांमधून राहुलने स्वत:सह इतर तिघांना पैसे वाटप केले.

त्यात विकास हेमके यास सुमारे 12 लाख रुपये दिले होते. तर राहुल याने स्वत:च्या हिश्श्यातील पैशांतून आलिशान कार खरेदी केली. महागडा मोबाइल एका बायकोस भेट म्हणून दिला तर 14 लाख 60 हजार रुपये त्याच्या दुसर्‍या पत्नीस दिले होते. तेदेखील पोलिसांनी हस्तगत केले आहेत.

हेही वाचा :

Back to top button