Women World Cup : टीम इंडियाची अग्‍निपरीक्षा | पुढारी

Women World Cup : टीम इंडियाची अग्‍निपरीक्षा

हॅमिल्टन ; वृत्तसंस्था : सलामी सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तावर दणदणीत विजय मिळविल्यानंतर आत्मविश्‍वास वाढलेला भारतीय संघ गुरुवारी (ता. 10) महिला वन-डे वर्ल्डकप (Women World Cup) क्रिकेट स्पर्धेत यजमान न्यूझीलंडविरुद्ध भिडणार आहे. नुकत्याच झालेल्या वन-डे मालिकेत स्वीकाराव्या लागलेल्या पराभवाची परतफेड करण्यास भारतीय संघ सज्ज झाला आहे.

तसे पाहिल्यास महिला वन-डे वर्ल्डकपमध्ये न्यूझीलंडविरुद्ध भारताची कामगिरी निराशाजनकच ठरली आहे. गेल्या 44 वर्षांत दोन्ही संघांदरम्यान वर्ल्डकपमध्ये एकूण 12 सामने झाले आहेत. यामध्ये भारताने केवळ दोन सामने जिंकताना 9 गमावले आहेत. तर, एक लढत टाय झाली होती.

भारताने दोन विजय 2005 आणि 2017 मध्ये झालेल्या वर्ल्डकपमध्ये मिळविले होते. 2017 मध्ये भारताने न्यूझीलंडला 186 धावांनी पराभूत केले होते. उल्लेखनीय म्हणजे भारताच्या या दोन्ही विजयात मिताली राजने सामनावीरचा पुरस्कार पटकावला होता. यामुळे उद्याच्या सामन्यातही मितालीकडून शानदार कामगिरीची अपेक्षा आहे. पाकविरुद्धच्या सामन्यात मितालीने केवळ 9 धावांचे योगदान दिले होते. (Women World Cup)

सलामीवीर स्मृती मानधनाकडून या सामन्यात मोठ्या खेळीची संघाला अपेक्षा आहे, तर दीप्‍ती शर्मा, स्नेह राणा, पूजा वस्त्राकार, मिताली राज यांनाही जबाबदार कामगिरी करावी लागणार आहे. मात्र, भारतीय फलंदाजांना डिवाईन, सूजी बेटस्, अ‍ॅमी सॅथरवेट आणि अ‍ॅमेलिया केर यांचा सामना करणे म्हणजे अग्‍निपरीक्षाच ठरणार आहे. तर दोन सामन्यांत एक विजय मिळविणार्‍या न्यूझीलंडला गुणतक्त्यातील स्थान सुधारण्यासाठी विजयाची गरज आहे.

Back to top button