Pushpa चित्रपटातील सामी सामी’ च्या मराठी व्हर्जनला मिळतेय पसंती, गाणं तुफान व्हायरल | पुढारी

Pushpa चित्रपटातील सामी सामी' च्या मराठी व्हर्जनला मिळतेय पसंती, गाणं तुफान व्हायरल

नाशिक (निफाड) पुढारी वृत्तसेवा : अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेल्या पुष्पा (Pushpa) या चित्रपटातील श्रीवल्ली व सामी ( (SAAMI SAAMI) सामी या गाण्यांनी रसिकजनांवर मोहिनी घातली. मूळ तमिळ असलेल्या या चित्रपटातील हिंदीत डब केलेल्या गाण्यांनीही प्रचंड दाद, लोकप्रियता मिळवली. याच धर्तीवर धारणगाव वीर ता. निफाड येथील जय मल्हार जागरण गोंधळ पार्टीचे कलाकार धर्मा दराडे व गिरीजाबाई बर्डे या कलाकारांसह नाशिक येथील उदयोन्मुख युवा कलाकार तेजस्विनी भामरे यांच्या सामी सामी या मराठी व्हर्जन असलेल्या गाण्यालाही लाभली असून तुफान विनोदी असलेला हा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

व्हीडिओ पाहताना रसिक खळखळून हसताना दिसत आहे. निफाड तालुक्यातील बोकडदरे, विंचूर एम आय डी सी या भागात चित्रीकरण केलेल्या या गाण्यात म्हैस, मेंढ्या, शेळ्या यांचाही विनोद निर्मितीसाठी सर्रास  वापर करण्यात आला असून त्यामुळे हे गाणे अधिकाधिक विनोदी झाले आहे. (Pushpa)

वयोवृद्ध माणसाचे एका युवतीच्या प्रेमात पडणे, ही गोष्ट त्याच्या बायकोला समजणे, ती लाकूड घेऊन त्याच्यामागे लागणे, शेवटी ती युवती त्याचा हात धरून त्याच्यासोबत पळून जाणे, त्या पाठोपाठ त्याची बायको व तिच्या पाठोपाठ युवकांचे टोळके पळत जाणे असा घटनाक्रम असलेले हे गाणे पाहताना रसिक हसून हसून थक्क होतात. एक चांगले गाणे पाहिल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर पसरते.

निफाडचे साहित्यिक गीतकार दत्तात्रेय बैरागी यांनी हे गीत लिहिले असून केसावर फुगे या गीताचे लोकप्रिय गायक अण्णा सुरवाडे यांनी हे गीत गायले आहे. जळगाव येथील प्रसिद्ध डी. जे. मनू यांनी हे गीत संगीतबद्ध केले आहे. ऋतिक उबाळे या युवकाने या गीताचे चित्रीकरण केले असून समाधान मासुळे यांनी दिग्दर्शन केले आहे. अत्यंत विनोदी असलेल्या या गाण्यामुळे धारणगाव वीर येथील जय मल्हार जागरण गोंधळ पार्टीचे कलाकार फक्कड गंभीरे, शिवराम रोकडे आदी कलाकारांनी साथ लाभली असून सध्या या गाण्याची मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे. जागरण गोंधळ पार्टीचे हे तुफान विनोदी गाणे प्रचंड लोकप्रिय मिळवेल अशी अपेक्षा रसिकांकडून व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा :

पहा व्हिडिओ : “एक दिवस नको ३६५ दिवस महिलांचा सन्मान करा” – रूपाली चाकणकर

 

Back to top button