नाशिक पुढारी वृत्तसेवा : नाशिक जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाने पोषण आहार अभियानात राज्यात तिसरा क्रमांक मिळवला आहे. महिला दिनानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते महिला व बालविकास सभापती अश्विनी आहेर, मुख्यकार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपक चाटे यांनी मुंबईत हा सन्मान स्वीकारला.
जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाने राबविलेल्या एक मूठ पोषण योजनेमुळे जिल्ह्यातील कुपोषणाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे पोषण आहार जनआंदोलन कार्यक्रमात नाशिक जिल्हा परिषदेने राज्यात तिसरा क्रमांक पटकावला. या कामगिरीबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्यासह अन्य अधिका-यांचा सन्मान यावेळी करण्यात आला. यावेळी नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे देखील उपस्थित होते.