अजित पवार यांच्या शब्दाला काडीचीही किमत नाही, एसटी संप प्रश्नी गोपीचंद पडळकर पुन्हा आक्रमक

मुंबई; पुढारी ऑनलाईन
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरुन सरकारला धारेवर धरणार असल्याचा इशारा भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे. कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचे षडयंत्र सुरु आहेत. एसटीमध्ये खासगी कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा सरकारचा मानस असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सरकारमध्ये अजित पवार यांच्या शब्दाला काडीचीही किंमत राहिलेली नाही, असा टोला पडळकर यांनी लगावला आहे.
एसटी कर्मचाऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचं काम होत आहे. सध्या कर्मचारी रोजंदारीवर काम करत आहे. या प्रश्नी आम्ही सभागृहात चर्चा करणार असल्याचे पडळकर यांनी म्हटले आहे. दरम्यान, माजी आमदार सदाभाऊ खोत यांनी, सरकारला एसटीचे खासगीकरण करायचे आहे. त्यासाठी हा आघाडी सरकारचा खटाटोप सुरु असल्याचा आरोप केला आहे.
मागील चार महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांचे विलिनीकरणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. यावर अद्याप तोडगा निघाला नसताना राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण शक्य नाही, अशी शिफारस तीन सदस्यीय समितीने केली आहे. याबाबतचा अहवाल परिवहन मंत्री अनिल परब यांनी नुकताच विधानसभेत पटलावर सादर केला. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार समिती गठीत करण्यात आली होती. त्यानुसार तत्कालीन मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समिती स्थापन केली होती. या समितीने काही दिवसांपूर्वी अहवाल न्यायालयाला सादर केला होता. परंतु मंत्रिमंडळाची मान्यता घेऊन हा अहवाल सादर करण्यास न्यायालयाने सरकारला सांगितले होते. त्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा अहवाल सादर केला होता. त्यानंतर हा अहवाल अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान मंत्री परब यांनी विधानसभेच्या पटलावर ठेवला.
हे ही वाचा :
- कोल्हापूर : एसटी संपामुळे नोकरी गेली तर कर्ज कसे फेडायचे?, गारगोटी आगारातील चालकानं संपवलं जीवन
- एसटी संपकरी कर्मचाऱ्यांना वेतन नसल्याने कुटुंबीय हवालदिल