कीव्ह : पुढारी ऑनलाईन
२४ फेब्रुवारी २०२२चा दिवस युक्रेनसाठी काळा दिवस ठरला. बलाढ्य रशियाने चिमुकल्या युक्रेनवर घणाघाती हल्ला करत युद्ध पुकारलं. गेले १३ दिवस हा रक्तरंजित संघर्ष सुरु आहे. दिवसोंदिवस तो अधिक चिघळतोय. युद्धभूमीवरुन उद्ध्वस्त झालेल्या युक्रेनच्या अनेक कथा समोर येत आहेत. अशातच तामिळनाडूमधील विद्यार्थी युक्रेनच्या लष्करात ( Ukraine Army ) भरती होत रशियाच्या सैनिकांशी सामना करत असल्याचे वृत्त समोर आले आहे. ज्या देशात आपण शिक्षण घेत होतो, त्या देशाच्या संरक्षणासाठी तो सरसावला आहे. याची माहिती त्याच्या आईवडिलांनाही नव्हती. याबाबतची माहिती मिळाल्यावर त्याच्या पायाखालची जमीनच सरकली आहे.
तामिळनाडूनमधील कोईंबतूर येथील सैनिकेश रविचंद्रन हा शिक्षण घेण्यासाठी २०१८ मध्ये युक्रेनला गेला. तो खार्किव्ह येथील नॅशनल एअरोस्पेस विद्यापीठात शिक्षण घेत होता. २४ फेब्रुवारी २०२२ रोजी रशियाने युक्रेनवर हल्ला केला आणि काही तासांमध्ये सारं काही बदललं. तसं पाहिल तर याचवर्षी सैनिकेश याचे युक्रेनमधील शिक्षण पूर्ण होणार होते. तो भारतात कायमस्वरुपी परतणार होता. मात्र नियतिच्या मनात वेगळेच होते.
रशियाने हल्ला केल्यानंतर सैनिकेश याचा आपल्या कुटुंबीयांशी संपर्क तुटला. यानंतर युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी भारत सरकारने ऑपरेशन गंगा सुरु केले. भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने युक्रेनमधील भारतीय विद्यार्थ्यांची माहिती घेतली. तोपर्यंत सैनिकेश हा युक्रेन लष्करात भरतीही झाला. त्याने सांगितले परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकार्यांना माहिती दिली की, रशियाविरोधात युद्ध लढण्यासाठी आपण युक्रेनच्या लष्करात सहभागी झालो आहोत.
सैनिकेश युक्रेनच्या लष्करात भरती झाला आहे. यासंदर्भात माहिती देताना त्याचे आई-वडील म्हणाले की, भारतीय
लष्करात अधिकारी होण्याचे सैनिकेशचे स्वप्न होते. यासाठी त्याने प्रयत्नही केला होता. मात्र याचा अर्ज स्वीकारला गेला नाही. यानंतर तो युक्रेनमध्ये शिक्षण घेण्यासाठी गेला. आता तेथे संधी मिळताच तो लष्करात भरती झाला आहे. सैनिकेशच्या रुपात एक भारतीय युक्रेनच्या लष्करात आपले योगदान देत असून, भारतीयांना अचंबित करणारी तर युक्रेनच्या नागरिकांसाठी आदर्श ठरणारी कामगिरी सैनिकेशने केली आहे.
हेही वाचलं का?