नाशिक : पुढारी वृत्तसेवा ; जिल्हा बँकेला ३१ मार्च अखेरपर्यंत जवळपास सातशे कोटी रुपयांची कर्जवसुली करायची आहे. यामुळे कर्जवसुलीसाठी बँकेच्या मुख्यालयातील सर्वच कर्मचारी, अधिकाऱ्यांना कामाला लावले आहे. बँकेने महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांचे दहा पथक तयार करून ते वसुलीसाठी पाठवले जात आहे.
नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची पीक कर्ज, मध्यम मुदतीची कर्ज यांची जवळपास २२०० कोटी रुपयांची थकबाकी आहे. यामुळे राज्य बँकेची देणी, ठेविदारांच्या ठेवी देण्यासाठी जिल्हा बँकेकडे रक्कम नाही. त्यातच मार्च अखेरपर्यंत ४० टक्के कर्जवसुलीचे उद्दिष्ट बँकेला देण्यात आले आहे. बँकेने ४० टक्क्यांपर्यंत कर्जवसुली केल्यास बँकेचा एनपीए कमी होऊन बँकेचे व्यवहार सुरळीत होण्यास मदत होणार आहे. आतापर्यंत बँकेने १० ते १२ टक्के वसुली केली असून उद्दिष्ट गाठण्यासाठी बँकेकडून कठोर मार्गांचा अवलंब केला जात आहे. यामुळे अधिक थकबाकी असलेल्या तालुक्यांमधील थकित कर्जदारांकडून वसुली करण्यासाठी बँकेने मुख्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना कामाला लावले असून महिलांची दहा पथके तयार केली आहेत.
या पथकांनी सोमवारी (दि.७) दिंडोरी तालुक्यात वसुलीसाठी कर्जदारांकडे तगादा लावल्यानंतर त्याविरोधात मोठ्याप्रमाणावर प्रतिक्रिया उमटल्याचे बघावयास मिळाले. मात्र, जिल्हा बँकेच्या प्रशासकांनी कोणत्याही परिस्थितीत कर्जवसुली करण्याचा चंग बांधल्यामुळे ही वसुली सुरूच राहणार असल्याचे बँकेच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.