नाशिक मनपा निवडणूक : सर्वच पक्ष व्यस्त ; मनसे मात्र शांत | पुढारी

नाशिक मनपा निवडणूक : सर्वच पक्ष व्यस्त ; मनसे मात्र शांत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : मनसेचा गड राहिलेल्या नाशिकमध्ये आगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी प्रचारासाठी कंबर कसल्याचे दिसून येत आहे. भाजप, सेना, राष्ट्रवादीसह काँग्रेसच्या प्रमुख नेते तसेच मंत्री, माजी मंत्र्यांचे नाशिकमध्ये दौर्‍यांवर दौरे सुरू असताना मनसेच्या गोटात मात्र कमालीची शांतता दिसून येत आहे. गेल्या काही महिन्यांपासून मनसेचा एकही बडा नेता नाशिकमध्ये फिरकलाच नसल्याने स्थानिक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ—मावस्था असल्याचे दिसून येत आहे.

आगामी मनपा निवडणूक केव्हा घोषित होणार याबाबत संभ्रमावस्था असली तरी, जवळपास सर्वच पक्षांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र आहे. गेल्या आठवड्यापासून नाशिकमध्ये नेत्यांचे दौरे सुरू झाल्याने, शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. गेल्या आठवड्यात भाजपचे नेते तथा राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकचा दौरा करून कार्यकर्त्यांमध्ये स्फुरण चढविले. त्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांनी नाशिकचा दौरा केला. तसेच भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनीदेखील नाशिक दौरा येत विरोधकांचा समाचार घेतला. त्याचबरोबर आयटी हबच्या उद्घाटनासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही हजेरी लावली. यावेळी भाजप नेते आमदार जयकुमार रावल यांच्यासह राज्यातील इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. तसेच नाशिकच्या प्रभारी पदाची पुन्हा एकदा जबाबदारी सोपविलेल्या संकटमोचक गिरीश महाजन यांनी शनिवारी (दि. 5) नाशिकमध्ये येऊन जणू काही आगामी निवडणुकीचे रणशिंगच फुंकले.

शिवसेनेकडून कृषिमंत्री दादा भुसे यांच्यासह उद्योगमंत्री सुभाष देसाई, संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांचे दौरे सुरू आहेत. राष्ट्रवादीकडून पालकमंत्री छगन भुजबळ यांचे शहरात कुठे ना कुठे कार्यक्रम सुरू असल्याने, कार्यकर्त्यांमध्ये हुरूप आहे. त्याव्यतिरिक्त राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचाही नाशिक दौरा झाला आहे. मधल्या काळात काँग्रेस प्रभारी ब—ीज किशोरदत्त यांनीही नाशिक दौरा करून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमधील मरगळ दूर करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या सर्व घडामोडींमध्ये मनसेमध्ये मात्र काहीशी शांतता दिसून येत आहे.
खरं पाहता नाशिक मनसेचा गड राहिला आहे. नाशिककरांनी मनसेला नाशिक महापालिकेवर सत्ता देण्याबरोबरच शहरात तीन आमदार निवडून दिले होते. मात्र, असे असतानाही मनसेत शांतता दिसून येत असल्याने, कार्यकर्तेही संभ—मावस्थेत असल्याचे चित्र आहे.

मनसेची मुंबईत बैठक
गेल्या आठवड्यात मनसेच्या स्थानिक पदाधिकार्‍यांची मुंबईत बैठक झाली होती. या बैठकीत पदाधिकार्‍यांनी शहरातील 170 इच्छुकांची यादीही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केली. आता लवकरच मनविसेचे अध्यक्ष अमित ठाकरे इच्छुकांच्या मुलाखती घेण्यासाठी नाशिकमध्ये येतील. पण, त्यांचा दौरा अद्याप निश्चित झाला नसल्याचेही सांगण्यात आले आहे.

ऑगस्ट 2021 मध्ये दौरे
मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी नाशिकची जबाबदारी अमित ठाकरे यांच्या खांद्यावर सोपविल्यानंतर ऑगस्ट-सप्टेंबर 2021 मध्ये अमित ठाकरे यांनी सलग तीन वेळा नाशिकचे दौरे केले. यावेळी कार्यकर्त्यांनी केलेली पोस्टरबाजीही चांगलीच चर्चेत आली होती. त्यांच्यासोबत मनसेचे बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे हे नेते असल्याने, कार्यकर्त्यांमध्ये हुरूप आला होता. पण त्यानंतर मात्र एकही मनसेचा नेता नाशिकमध्ये फिरकला नाही.

हेही वाचा :

Back to top button